Saturday, June 11, 2022

तेथे कर माझे जुळती...


काल बे एरिया मध्ये आर्ट ऑफ लिविंगचे गुरुजी म्हणजे अर्थात श्री श्री रविशंकर ह्यांचा एक छानसा कार्यक्रम आयोजला होता, ज्यात अगदी नवोदित बालकांनाही समाविष्ट होण्याची संधी होती. अर्थात माझ्यासारखे कित्येक पालक ह्या संधीचा लाभ घ्यायला आतुरलेले. मला तर अगदी ३ दिवस आधी ह्या सकाळच्या कार्यक्रमाचे तिकीट मिळाले. ईशानला बुधवारी रात्री सांगून झोपवलेलं, सकाळी आपल्याला साडे आठला निघायचंय तेव्हा लवकर तयार व्हायचय आणि मुळात कपड्यांवरून रुसायचं नाही. जमलं तर सदरा घालायचा आणि हट्ट न करता तयार व्हायचं नाहीतर तुला कार्यक्रमाऐवजी शाळेत रवाना करू. तसं ते पिल्लू तयार झालं. त्याला माहित नव्हतं आई नेमकं कुठे नेणार आहे ते... मलाही माहित नव्हतं त्याला कार्यक्रम आवडेल का? का तो कंटाळून मला घरीच आणेल पण तरीही म्हटलं पहावं प्रयोग करून. तशी मला थोडी खात्री होती किमान गाण्याचा आणि भजनाचा कार्यक्रम तो आवडीने पाहिलं ह्याची. नाही म्हणायला अगदी दीड वर्षाचा असताना त्याने माझा ३ तासाचा कथक चा कार्यक्रम न रडता पाहिला होता. शिवाय सहा महिन्यापूर्वी कथक च्या रेकॉर्डिंग लाही तो छान एकटाच बसला होता. म्हणून थोडा धीर केला होता. 

  लगबगीने आम्ही सकाळी कार्यक्रमाला पोहचलो, सभागृह एकदम भरले होते. अगदी दोन महिन्याच्या बाळापासून ते १२ वर्षाच्या मुलांपर्यंत खूप बालक - पालक तिथे होते. आम्हाला पोहचायला तसा उशीरच झालेला, त्यामुळे मागे जागा मिळेल तिथे आम्ही स्थिरावलो. बसता क्षणीच गुरुजींनी सगळ्यांना प्रेमाने हाक दिली आणि अखंड सभागृह शांत झाले. ईशानही त्याच सभेचा एक हिस्सा आणि त्यानेही सभेचा आदर करेल असं आचरण बसता क्षणीच दर्शवल. थोड्याच वेळात गुरुजींनी मेडिटेशन करू सुचवलं आणि मला कळेना आता हे पिल्लू काय करेल ह्याच. थोडेसे खुर्चीत बसून जमतील असे व्यायाम प्रकार सुरु केले आणि ईशान एकदम आपल्याला हे रोजचे शाळेतले प्रयोग आई बरोबर करायचेत तर आपण आईला आधी सांगावं हे असं आणि तसं कर ह्या आविर्भावात मलाच सूचना सुरु झाल्या. अगदी डोक्यावर हात मारावा का भरपूर हसावं ह्या द्विधा मनःस्थितीत असतानाच गुरुंजींची सूचना आली आता डोळे बंद आणि मोठे श्वास घ्या तसा हा पट्ठ्या एकदम सगळ्या सूचना व्यवस्थित follow करू लागला. ईशानच्या मॉंटेसरी मध्ये योगाचा एक तास घेतात एवढच मला वर्षभर माहीत होत पण नेमकं ह्या मुलांना ध्यानालाही बसवतात ह्याची सूतराम कल्पनाही मला नव्हती. घरी नाही म्हणायला तो माझ्यासोबत थोडा योगा करण आणि मी ध्यानाला बसल्यावर कधीतरी कॉपी करण ह्या पलीकडे ह्याने आम्हाला जराही शाळेच्या प्रयोंगबद्दल कल्पना दिली नव्हती. त्याच ते छानस रूप पाहून मला खूपच गंमत वाटली. काही का असेना हा १० मिनिट जर असा बसला तरी कार्यक्रम सफल झाला असं मला उगाच वाटलं.  संपूर्ण २५ मिनिटे जरी तो डोळे बंद करून बसला नाही तरीही सभेचा भंग करावा असं त्याने काहीच केलं नाही. आजू-बाजूच्यांना जराही त्रास दिला नाही. भजनाचा कार्क्रम सुरु झाल्यावर मात्र त्याला रेस्टरूम आणि रेस्टॉरंट ला जायचं होत. तसा मग ब्रेक घेतला आणि त्याचा डबा त्याला बाहेर खाऊ घातला. मग साहेब पुन्हा चार्ज झाले आणि आत आले. एव्हाना गुरुजींचा प्रश्न-उत्तराचा कार्क्रम सुरु होणार होता. मला पुन्हा चिंता आता हा बाहेर येईल आणि मला खेळायला नेईल. 


गुरुजींनी थोडेसे ज्ञानाचे संभाषण सुरु केले आणि त्या संभाषणात हे पिल्लूही रमले. सभेतल्या लोकनासोबत तो ही "yes", "no " अशी उत्तरे देऊ लागला. सगळ्यांनी टाळ्या वाजवल्या तर ह्यानेही आपल्या टाळ्या त्यात आवडीने ठोकल्या. मला वाटलं सगळ्यांसोबत मुलांना असं करायला आवडतच. पण थोडं निरखून पाहिलं तर साहेब मोठ्या माणसासारखे ऐटीत बसून सगळं ऐकत होते. शिवाय पहिल्यांदाच सभागृहात त्याला त्याची अशी खुर्ची मिळाली होती, त्याचाही रुबाब असावाच. गुरुजी सगळं इंग्रजीत बोलत असल्याने, ईशानला सगळं समजतंय ह्याची मला खात्री होती. मध्येच गुरुजींनी प्रश्न केला, इथे आर्ट ऑफ लिविंग चे किती शिक्षक आहेत? तसे काही हात वरती गेले, आणि त्यात आमच्या चिरंजीवाचाही लांबलचक हात वरती होता. कपाळावर हात मारून मी त्याला खाली कर म्हणाले तरी साहेब हटेनात. इतक्यात आजू-बाजूच्या आणि मागच्या रांगेतल्या सगळ्यांचाच हशा पिकला. मागच्या काका-काकूंनी त्याला एकदम विचारलंच, तू पण शिक्षक आहेस? तसा हा एकदम म्हणाला "हो तर, आहेच मी शिक्षक!" तस्से मला माझे भाऊ आजोबा आठवले (माझ्या आईचे वडील, तालुक्याच्या शाळेत मुख्याध्यापक होते). अजूनही आमच्या पूर्ण वंशावळीला मास्तरांच्याच नात्याने संबोधतात. अगदी कडक शिस्तीचे आणि सगळ्यांना शांतपणे धाकात ठेवणारे. उगाच मनात शंकेची पाल (का भीती?) चुकचुकली... कदाचित चुकून हेच नाही ना आले आपल्या पोटी? तेवढ्यात माझ्या बाजूच्या एका ताई म्हणाल्या, अग असेल तो गुरुजींचा मागच्या जन्मीचा शिष्य, तुला काय माहीत? तस्सा मी सुटकेचा निःश्वास टाकला. (ह्या निःश्वासाची कल्पना केवळ ज्या व्यक्ती भाऊंच्या सहवासात आले त्याच चांगली करू शकतील...) थोड्या वेळाने हळूच मी ईशानला पुन्हा विचारलं "तू खरंच शिक्षक आहेस का रे?" तो म्हणाला "mommy, I am a teacher okay?" तसं मान डोलावण्यापलीकडे माझ्या हातात काहीच नव्हतं म्हणा. मुलं आई-बाबाला कुठे तोंडघशी पाडतील ह्याची प्रचिती यायला आम्हाला आधीच सुरुवात झालीय, आता फक्त आशा करायची अगदी तोंडावर आपटेपर्यंत काही फजिती नको चार-चौघात! 

थोड्याच वेळात गुरुजींनी आश्चर्याचा धक्का दिला मागच्या सगळ्या माझ्या लाडक्या मुलांना मी भेटायला येतोय. कोणीच जागे वरून ऊठू नका आणि उगाच गर्दी करू नका. मी सगळ्यांना भेटायला येतोय. अर्थात अमेरिकेतली सभा सगळ्यांनी गुरुजींचा आदर राखला. उगाच कसलीच गर्दी धावपळ झाली नाही. आणि हळू हळू गुरुजी सगळ्या रांगांमध्ये येउन भेट देऊ लागले. आता पुन्हा माझ्यातली आई जागी झाली, ईशानला पट्टी पढवायला. गुरुजी येतील तर नमस्कार कर हात जोडून वैगरे वगैरे. त्याला गुरुजी हा शब्द तसा अनभिज्ञ. पण तो "हो" म्हणाला. हळूहळू गुरुजी आमच्या रांगेसमोर आले अगदी माझ्या आणि ईशानच्या अर्ध्या हाताच्या अंतरावर... मीही ह्या सत्पुरुषाला माझ्या आयुष्यात पहिल्यांदाच इतक्या जवळून पाहत होते आज. भारतात असताना गुरुजींना इतक्या जवळून पाहायचं कधीच भाग्य झालं नाही. कदाचित आपल्या सुपुत्राची कृपा असावी. आजच्या सभागृहातही सगळ्यांना इतक्या जवळून गुरुजींना पाहताच आलं अस नाही. काहीच इतके भाग्यवंत. त्यांना पाहता क्षणीच माझ्या डोळ्यातून अचानक अश्रू वाहिले... समजलच नाही नेमकं काय होत होते ते. ईशानही हात जोडून त्यांच्या समोर एकही अक्षर न बोलता काही क्षण स्तब्ध. गुरुजींना डोळे भरून पाहताही येणार नाही अशा काही तो ऊर्जेचा स्रोत भासला. ते थोडे पुढे निघाले, तसे ईशान म्हणाला "नमस्ते आजोबा!" तेव्हा मी अचानक भानावर आले. पाहिलं तर पिल्लू अजूनही हात जोडून होता. अचानक मला राऊळ महाराजांची आंगणे वाडीतली भेट स्मरली. त्यांना मी देवळाच्या गाभाऱ्यात अशीच सहजच भेटले होते, मला तर तो पर्यंत माहीतही नव्हत राऊळ महाराज कोण आहेत हे. त्यांनाही पाहता क्षणी माझ्या डोळ्यात असेच अश्रू आले होते... भानावर येईपर्यंत भक्तांची रांग त्यांच्यापुढे लागली आणि गर्दी जमली होती. त्या गर्दीतून बाहेर आले तसे मामा-मामी आणि मावशी-काका मला म्हणाले भाग्यवान आहेस तू इतक्या जवळून तुला पाहता आलं तेही तू पहिल्यांदाच आलेल्या जत्रेला. एवढ्या वर्षात पहिल्यांदा आम्हालाही त्यांचे ह्या जत्रेत दर्शन झाले, कदाचित तुझा पायगुण असावा... तेव्हा मला काहीच समजल नव्हतं. त्या नंतरचा हा तसाच एक सुखद अविस्मरणीय, वर्णातीत अनुभव. जेथे सगळ्यांचेच सहज कर जुळले होते, मनं प्रसन्न झाली होती आणि आनंदाश्रू ओसंडून वाहत होते...