ऑगस्ट महिन्यात मी कोकणात माझ्या सगळ्या हृद्य नातेवायीकांना भेटण्यास गेले होते. योगा-योगाने टिळक पुण्यतिथीही होती, म्हणून मावशीच्या शाळेला भेट देण्याचा योगही चांगला होता. माझ्या मावशी - मामांच्या शाळा म्हणजे त्यांच्या आणि आमच्या आयुष्यातला तसा अविभाजक घटक. त्यामुळे आम्ही कोणीही कोकणात गेलो की नातेवायीकांना ज्या तन्मयतेने किंवा आदरापोटी आम्ही भेटतो त्याहीपेक्षा किंबहुना जास्तच हृद्य् पोटी ह्या शाळांना भेट देतो .
मावशीची शाळा अगदी छोटी. तिथे एका छोट्या hall मध्ये पाचवी ते दहावीची मुले रोज प्रार्थनेला बसू शकतात एवढी कमी पटसंख्या असणारी. सगळ्या कार्यक्रमांना अख्खी शाळा एकत्र येते. सगळा शिक्षक वर्ग पालकांसारखा मुलांसाठी राबतो. अशा ह्या शाळेतली एक-एक नवी गोष्ट मावशी मला अगदी घरातल्या गोष्टीसारखी आपुलकीने update करत असते. ह्या शाळेतले सगळे शिक्षकवर्ग मला आपली भाचीच असल्यासारखा वागवतो. तर अशा शाळेतल्या कार्यक्रमांना जाणे म्हणजे माझ्यासाठी एक पर्वणीच! तिथे मला मुलांमध्ये बसून कार्यक्रम पाहण्यापासून ते त्यांना शिकवण्यापर्यंतचे सगळे हक्क मिळतात. तर थोडक्यात ही अगदी घरची शाळा!
शाळा सोडून खूप वर्ष झाली तरीही शाळेतल्या कार्यक्रमांच मला आजही खूप अप्रूप वाटतं. असो, तर अश्या ह्या शाळेत मी टिळक पुण्यतिथी साजरी करायला गेले होते. म्हणजे - शाळेतला कार्यक्रम पाहायला आणि सगळ्यांना भेटायला. कार्यक्रम जरी लहान शाळेतला असला तरीही तयारी जय्यत होती. अगदी निवेदन करणाऱ्या सरांपासून ते भाषण करणाऱ्या मुलांपर्यंत सगळच pre- planned! कार्यक्रमाला सुरुवात होणार आणि त्याच वेळेस अगदी प्रमुख पाहुण्यांनी उपस्थित न राहण्याची घंटा वाजवली. झाल, आता पाहुणे कोणाला बनवणार ह्यावर सगळ्या शिक्षकांचं अगदी एकमतच झाल - आणि अचानक शाळा-भेटीसाठी आलेल्या पाहुण्यांची "प्रमुख अध्यक्षा" म्हणून निवड झाली. लगेचच कार्यक्रम नियोजित करणाऱ्या शिक्षकांनी मला माझे roles समजावून दिले. फक्त कार्यक्रम संपल्यावर मुलांना दोन गोड शब्द सांगावेत अशी खूपच गोड आग्रहाची विनंतीही त्यांनी मुलांसमोर केली. झालं, तर अशा प्रकारे, मी अध्यक्षा म्हणून प्रमुख खुर्चीवर विराजमान झाले. शाळेत असताना मला कार्यक्रमांना येणाऱ्या अध्यक्षांच खूपच नवल वाटे. ते कोणी खूपच गुणी सज्जन असल्यासारखं वाटे. ह्या पदाला यायचं म्हणजे खूप मेहनत करून यश संपादन कराव लागत वगैरे वगैरे ...खूपच काही कल्पना होत्या- त्या सगळ्या कल्पनांना धुळीला मिळायला फक्त मला त्या खुर्चीवर बसण्याचा एक निमिष खूप ठरला. मला वाटत होत कदाचित आज मी पाठी बसून मुलांची आणि अध्यक्षांची भाषण ऐकणार, म्हणजे किमान आज तरी माझ्या पोटात गोळा नाही येणार. पण झालं उलटच. आता तर माझ्या पोटात त्या मुलांपेक्षाही मोठा गोळा येत होता. किमान भाषण देणाऱ्या मुलाला भाषण होईपर्यंतच 'कसतरी' वाटत राहत. पण मला मात्र संपूर्ण कार्यक्रम आणि त्यानंतरही! अगदी खुर्चीवर बसल्यापासून ते अगदी मी "उपदेशपर शब्द सांगेपर्यंत" माझी सगळी हालचाल मुल टिपत होती. त्यातून निवेदकांनी माझं जरा जास्तच कौतुक करून मुलांसाठी मला मोठ बनवलं होत. त्यामुळे मी जरी कोणत्या विद्यार्थ्याशी हसले तरी आजूबाजूची सगळीच मुल त्या मुलाशी कुजबुजायची. अशा ह्या अवस्थेत विद्यार्थ्यांची भाषण ऐकताना मीच कितीदा तरी पाणी प्यायले. त्यातून मला चांगल्या भाषण करण्याऱ्या मुलाचं कौतुक त्यांच्या नावानिशी करण कर्तव्यपर होत. अशा ह्या अध्यक्षा, college मध्ये बसून जरी notes काढायला विसरल्या असल्या तरी आता मात्र सगळं अगदी आत्मीयतेने टिपत होत्या. सगळ्या मुलांचा समज - ह्या आपला number काढणार आणि मला मात्र सगळेच अस्खलित बोलत असल्याचा भास. अगदी रणांगणात उतरल्यावर अर्जुनाची अवस्था काय झाली असेल ह्याची प्रचीती तेव्हा आली. म्हणता म्हणता मुलांची भाषणे संपली आणि अध्यक्षांच्या दोन शब्दांसाठी 'नम्र विंनती' झाली. अध्यक्षा उठता क्षणी टाळ्यांच कडकडाट झाला. सगळ्या मुलांचे कान माझ्या तोंडून कसले उपदेशपर डोस निघताहेत ह्याकडे, अर्थात काही वात्रट मुलांचे ' मी असा काय डोस देणार? ह्याकडे! ' मला अशा वात्रट मुलांचाच वर्ग नेहमी मोठा वाटतो. त्यामुळे अगदी भीतीपोटी मी सुरुवातीलाच त्यांना साकड घातल. " मी अगदी तुमाच्यातलीच एक विद्यार्थी आहे.पाठी बसून दंगा करणारी. वात्रटपणे चेष्टा करणारी. शाळेत असताना कितीदा तरी बाकावर उभी राहणारी. तेव्हा माझ्या विद्यार्थी मित्र- मैत्रीणीनो, माझं जर काही चुकलच तर मला सांभाळून घ्या." मग मुलांना काय झालं काय माहीत सगळे अगदी शांत बसून ऐकायला लागले. मी त्यांना जे काही सांगत होते ते अगदी घरातली ताईच सांगतेय की काय ह्या अविर्भावात सगळे माना डोलवत ऐकत होते. मलाही अगदी मी त्यांचाशी गप्पा मारतेय असाच वाटू लागल. मग २ मिनिटांची २० मिनिटे कशी झाली हे माझं मलाच कळलं नाही.
गप्पांच्या ओघात मी परत शाळेशी एकरूप झाले...शाळेतले सगळे आदर्श पुन्हा एकदा लक्ख उभे राहिले. ज्यांमुळे मी गुणी विद्यार्थी बनले, एक उत्तम माणूस म्हणून वाटचाल करण्याचे निश्चय बांधले ते सगळेच मार्गदर्शक मला टिळक पुण्यतिथी निमित्ताने पुनच्श भेटले - फक्त ह्यावेळी ते अध्यक्षांच्या रुपात बोलत होते!