खास राखून ठेवलेला फराळ- डबा काढत पियूची आजी आणि पियू दोघीही दिवाळी नेणा-या आजीजवळ जाऊन बसत. पियूची आजी अगदी अदबीने दिवाळी न्यायला आलेल्या समवयस्क म्हातारीला कशी आहेस हे विचारी. तिनेही सगळ कुशल मंगल असल्याची पावती दिल्यावर मग पियुची आजी सुस्कारा सोडे. कधी हलकेच दहा-पन्नासाची नोट तिच्या हातावर टेकवी आणि मागच्या अमावस्येला का आली नाहीस इथपासून ते मुलाच्या नोकरी ते लग्न इथ पर्यंत सा-या चौकश्या करी.
ग्रहणानंतर हमखास दिसणा-या चेह-यांपैकीचा हा एक चेहरा. कित्येक अमावस्येलाही ही आजी येई. घरातून कधी पीठ तर कधी काही शिधा नेई. "दे दान सुटे गिराणवाली" ही आजी दिवाळी पण अशीच मस्त सूरात मागे. काहीशा त्या विशिष्ट आवाजासाठी आतुरलेल्या पियूला ही आजी आली की गंमत वाटे. कित्येकदा तिला दान म्हणून दानकरी नको असलेला फराळ देत तर काही त्रासलेले चेहरे "तुझ बरं ग बाई, आयता फराळ तझ्या नशिबात वाढून ठेवलाय ते" म्हणत काही-बाही पुढे सरसावत. पण पियूची आजी मात्र ह्या आजीशी वेगळ वागे. नको असणार खाणं टाकलं तरी बेहत्तर पण तिला कधी अशी उष्टावळ वाढत नसे. उलट तिच्या जवळ मायेने जाऊन तिची सगळी कर्म-कहाणी ऐके. क्वचित डोळ्याच्या कडा पाणावल्या की चहा आणते अस म्हणून घरात जाई. चहासोबत तिच्या हातावर कधी पैसे ठेवी तर कधी जुनी साडी. पियू हे सगळ न्याहाळतच मोठी झाली. दिवाळी सुरु होताना जितकी ती आतुर होत असे तितकीच आतुर ती संपतानापण असे.
पुढे पियू अभ्यासाच्या ओझ्यात बुडून गेली. दिवाळी आता फ़क्त P.L. म्हणून पाहू लागली. पियूची आजी गेल्यावर दिवाळीत खास राखायचा घरातला फराळ- डबाही बंद झाला. दिवाळी न्यायला येणारी आजीही कधीतरी यायची थांबली.
पण आता आपल्या सुखसंपन्न घरात दिवाळी झाल्यावर उरलेला फराळ पाहताना मात्र पियूला आपल्या आणि दिवाळीवाल्या आजीच्या आठवणीने उगीचच व्याकुळ करून सोडल होत...