एकदा का मायदेश सोडला की प्रत्येक प्रांतीय आपला कुठे ना कुठे पाऊलखुणा शोधायचा प्रयत्न करतोच. त्या नाही मिळाल्या की मग त्या उमटवायचा प्रयत्न! त्यातून मराठी माणूस म्हटलं की, उत्तम साहित्य, संगीत, नाटक आणि त्यासोबतच त्याची खाद्यसंस्कृती आणि सणवार ह्या सगळयाचा शोध तो जगाच्या पाठीवर घेतच राहतो. जमेल तिथे आपलं जग प्रस्थापित करतो आणि खास मराठी संस्कृतीचा ठेवा जतन करतांना नवीन दिशेने प्रवास सुरु करतो. माझंही काहीसं असंच झालं.
२०११ मध्ये नोकरी निमित्त डॅलस, टेक्सास इथे आले आणि अचानक माझं मराठीपण हरवण्याच्या खुणा मला दिसू लागल्या. सोबत काम करणारे एकतर अमेरिकन, ज्यू, युरोपिअन किंवा भारतातले विविध प्रांतीय पण मराठी क्वचितच कानी येणार वर्ग. नव्या प्रांतात कौमार्य अवस्थेत असल्याने खूपशा मराठी कुटुंबाचाही संबंध तसा तुरळकच होता. मराठी मंडळ संकल्पना ही माझ्यासाठीतरी त्यावेळी म्हणजे मराठी कुटुंबांशी संलग्न असणारी संस्था आणि कार्यक्रमांनाही सर्व साधारण कुटुंबीयच येत असावेत अशीच होती. अर्थात, येऊन दोनच महिने झाले होते त्यामुळे शहरातील भारतीयांची बरीचशी माहितीच नव्हती. फेसबुक वर अजून शहरातले मराठी कट्टे जमायचे होते आणि मराठी खाणावळही त्या शहरात तेव्हा नसल्याने मराठीची भूक फक्त मी सोबत आणलेल्या मराठी साहित्यावर भागवत होते. ऑफिसला जाता येताना देशी रेडिओ मात्र ऐकायला मिळत होता. तोच रेडिओ मग घराच्या टेबलक्लॉक वर सकाळ-संध्याकाळी ऐकायचा.
साधारण महिन्यानंतर जाणवलं ह्या रेडिओ वर भारतातल्या विविध भाषा ऐकू येतात पण मराठी भाषा ऐकूच येत नाही. मग त्या रेडिओची वेबसाईट पहिली तर पक्कचं झालं, मराठी कार्यक्रम होतच नव्हते तर! मनात अगदी खट्ट झालं. त्याच आठवड्यात माझ्या मावसभावाशी फोनवर बोलणं झालं तो तर पार विस्कॉन्सिनला राहणारा. तिथे तर भारतीय गंधच मुळात विरळा. त्याने मला सुचवलं तू तर किती छान कार्यक्रम करू शकतेस. बरं म्हणून फोन ठेवला, आणि विचारांचे नवीन सत्र चालू झाले. अचानक कस्तुरी मृगाला कस्तुरी सापडावी तसच काहीसं झालं... शाळेत असताना थोडेफार बालचित्रवाणी आणि किलबिल कार्यक्रम केले होते आणि शिवाय शाळेत अखंड स्मरणिका कार्य, विविध स्पर्धांसाठी नाटकं लिहिणं, बसवणं, कार्यक्रमांचे सूत्रसंचालन असा बराचसा इतिहास दिसू लागला. उन्हाळी सुट्टीतही आम्ही भावंडं बरेच प्रयोग करायचो आणि त्या कार्यक्रमांचे दिग्दर्शन, लिखाण आणि सूत्रसंचालन करण्यात मला खूपच उत्साह असायचा. झालं मग त्वरित त्या शाळेतल्या आठवणींच्या बळावर आणि भावाच्या शब्दांच्या पाठबळावर पुढचा कसलाही प्रश्न मनात न आणता त्वरितचं रेडिओ संपर्काला ई-मेल केला, आणि चक्क विचारलं मराठी कार्यक्रम ह्या रेडिओवर का बरं होत नाहीत? दुसऱ्या दिवशी मला त्यांचे उत्तर म्हणजे, थेट भेट घेण्यासाठीच त्यांनी मला बोलावलं.
रेडिओ CEO म्हणजे साक्षात शबनम मॉडगीळजी माझ्यासमोर. त्यांनी स्मितहास्यात विचारलं , "So you're that girl, who asked us why not Marathi is on this radio? As per Dallas head counts there are 600+ marathi families and Funasia Radio has not yet captured those hearts? You know I grew up in Nagpur during my schooling days, and I absolutely love Marathi but cannot do marathi programs. But I would love to give you weekly hour spot and see what magic you can bring to our Radio. Will you take it?" पहिल्याच काही मिनिटातला हा प्रश्न म्हणजे बाउन्सर होता. पण त्याक्षणी जर मी होकाराला दिरंगाई केली असती तर डॅलस रेडिओ वर पुढली पाच वर्ष मराठी ऐकायला आलं नसत.
काहीही मोबदला न घेता सातत्याने सुरुवातीचं एक वर्ष गुरुवारी सकाळी १० वाजताना (नोकरीतून ही वेळ मी मॅनेज करत होते) आणि मग पुढली चार वर्ष शनिवारी दुपारी १-२ ह्या अगदी प्राईम वेळेत मी हितगुजचे कार्यक्रम करत राहिले. प्रत्येक कार्यक्रम करताना एकच ध्यास होता, आज ह्या शहरात आलेला कोणीतरी आपली मायबोली आणि संस्कृतीशी नाळ घट्ट करू पाहत असेल, त्याला ह्या शहरातल्या मराठी कार्यक्रमांची माहिती हवी असेल आणि त्यापल्याड नवनवीन मराठी गाणी, नवीन मराठी प्रतिष्ठित साहित्यिक, संगीतकार आणि नवीन मराठी साहित्याशी ओळख करून हवी असेल त्या प्रत्येकाला हा कार्यक्रम आपलासा वाटलला पाहिजे. मग कधी हितगुजमध्ये खास पाहुण्यांशी गप्पा तर कधी नवीन पुस्तकांवरची टिपणी, कधी नवीन चित्रपटांची माहिती तर कधी जुन्या कधीही न हरवू वाटण्याऱ्या सांगीत आणि साहित्याची हमखास नोंदणी. ह्या उपक्रमात मला डॅलस मधल्या सगळ्या मराठी माणसांना एकत्र आणायचं होत, म्हणून मग शहरातल्या मराठी बंधू-भगिनींना घेऊन छान श्रुतिका तयार केल्या, त्या अमेरिकन मराठी माणसाला आपल्या वाटाव्यात अश्याच असाव्यात ह्याकडे लक्ष दिलं. त्यात कधी शोकांतिका तर कधी मजेदार किस्से, कधी नवनवीन शोध तर कधी अमेरिका पाहायला येणाऱ्या पालकांच्या मनस्थितीचा शोध, अशा विविध रोजच्या आयुष्यातला कथा आणि त्यातून मराठीमनांची मराठी संस्कृती जतन करण्याची धडपड दर्शविण्याचा तो एक आवडीचा उपक्रम ठरू लागला. अगदी इथे जन्मलेल्या मराठी लेकरांचं कौतुकही ह्या कार्यक्रमातल्या "इवलेशी रोपे" ह्या सदरात मी करायचे. ह्या सदरात मला माझ्या बांधवांकडून कधी तर खूपच थक्क करणाऱ्या कामगिरींची माहिती मिळू लागली. खूप जण आवडीने आपल्या पाल्यांची घोडदौड मला सांगू लागली. अगदी दक्षिण आशियाई सौंदर्य स्पर्धेत जिकंलेली कुमारी ते राज्यस्तरीय अमेरिकेन खेळातला खेळाडू ह्या सगळ्यांना हितगुजमध्ये हक्काची गप्पांची बैठक मिळे. इथल्याच मुलांशी मैत्री झाल्यावर, मग तर मला इथल्या पिढीला कधी ज्ञानेश्वरीतल्या निवडक ओव्यांचा साध्या भाषेत परिचय ते महाराष्ट्रातील विविध लोककला, भाषेतल्या गमती-जमती, भजनाची गोडी तर कधी आयुष्याच्या सगळया क्षेत्रात ज्यांनी लाखमोलाचा ठेवा निर्माण केला अश्या सगळ्यांशीच त्यांची गट्टी जमावी म्हणून कार्यक्रम करण्याचं नवं बळ मिळू लागलं. ज्या पूर्वजांनी आपल्या घरावर तुळशी पत्रे वाहिली आणि आपल्यासारख्यांना आज खुले आभाळ दिले त्या स्वातंत्र्यवीरांचे आणि विरांगणाचीही ओळख ह्या नवीन पिढीला करून देताना माझा ऊर कित्येक वेळा भरून आला.
असा हा स्वतःची ओळख राहावी म्हणून सुरु झालेला मराठी रेडिओचा प्रवास माझ्या आयुष्यतील एक मोलाचे योगदान ठरेल ह्याची जाणीव मला मला शहर सोडताना रेडिओ कार्यकर्त्यांनी, कैक मराठी कुटुंबांनी आणि असंख्य चाहत्यांच्या रेडिओ स्टेशन वरच्या सततच्या फोनने दिली.
अजूनही मला भेटल्यावर जेव्हा काही चाहते मला प्रेमाने "आर. जे. प्रणाली" म्हणून संबोधतात तेव्हा माझ्या मुखातून एकच घोष-वाक्य निघत, "हितगुज हे तुमच्याशी, जोडूया नाते मराठी मातीशी!"
* सदर लेख माझा मावस भाऊ अमीत लोकरे ह्याला समर्पित. जो आज फिलाडेल्फियामध्ये आपल्या दोन मुलींना उत्तम मराठी साहित्याची गोडी लावत आहे.