रोजच्या आयुष्यातल्या प्रवासाचा वेग वाढवता वाढवता कधीतरी वाटत आता लाल दिवा लागावा आणि थोडं थांबावं, तशीच माझी शुक्रवारची सकाळ! उठले तोच हलकासा ताप आणि सर्दीचा जोर वाढलेला. आवडीची महत्वाची काम करत असली तरी आजचा दिवस आरामात घालवायचा असा मानाने आणि शरीराने दोघांनीही कौल दिलेला. अमेयने सक्त ताकीद देऊन 'आज लॅपटॉप जवळ फिरकलीस तर बघ' ह्या भूमिकेने सकाळी फुकटचा ब्रेकफास्ट दिलेला! गादीवर पडून राहावा हा माझा स्वभाव नसल्याने, काहीतरी उद्योग करावा म्हणून थोडी वहीवर रंगरंगोटी केली, जमतील तेवढे कामाचे नवीन विचार रेखाटले आणि वाचत असलेल्या दोन पुस्तकांपैकी एकाची गाडी सुरळीत नेऊ ह्या विचारांच्या छापा काटा खेळत बसले. खूपदा आखीव रेखीव प्रवास आवडणारे आणि करणारे बहुतांशी आपण, अशा एखाद्या फुटकळ प्रसंगी पण नको ते पूर्ण करण्याच्या छंदात अडकतो आणि हरवून जातो.
पुन्हा एकदा विचार केला, नेमकं होतंय काय त्याचा थोडा शहानिशा लावू. म्हणून विचार केला, दोन्ही पुस्तकांपैकी एकाला हात न लावण्याचे कारण शोधूया मग उरलेल्या रिकाम्या वेळेत कामकरी मुंगीला एखदा तरी उद्योग मिळेल. एक पुस्तक बायोग्राफी सदरात मोडणारं, एका बलाढ्य श्रीमंताची आणि जगात वेगळी स्वप्ने सत्यात उतरवण्याऱ्याची ज्यात ताकद आहे तरीही त्यातले काही अनुभव साशंक असावेत अशी मनाला असलेली शंका तर दुसरे पुस्तक सेल्फ हेल्प प्रकारातले, ज्यात नाही म्हटलं तरी बऱ्याचदा थोडासा स्वतः मध्ये कमीपणा जाणवू लागेल असं आपसूकच वाटावं. मग जरा विचार केला आज काय झालं किंवा केलं तर झक्कास वाटेल? रोजच्या कामांनी स्वतःहूनच निषेध दाखवलाय आणि आजारी झाल्यावर आश्चर्य वाटावं असं घर सुरळीत चालताना पाहून मनालाही वाटावं "आज का दिन जिले अपना।" बस इतकाच इशारा खूप होता. एखदा स्वैरानुभ वाचावा किंवा लिहावा एवढंच वाटत होत तर! पुस्तकांच्या न वाचलेल्या खणात डोकावलं आणि "काश्मिरीयत" बाहेर काढलं.
इतके दिवस हे पुस्तक वाचायला हातच लावला नव्हता ह्याची दोन कारणे - १. मी लेखिकेला आठवड्यातून आवर्जून भेटतेय त्यामुळे ह्या पुस्तकात नेमक्या त्रुटी कशा झाल्यापासून ते बरयाच अनुभवांची थोडीशी ओळख असल्याने वाटावं हे माहितेय २. आपल्याला आपला सगळा वेळ प्रोडूक्टिव्हिटी प्रकारात मोडावा असा वाटणाऱ्यातील मी, बऱ्याच वेळा नको ते कूटप्रश्न सोडवण्याच्या मार्गावर राहणार ह्या मनस्थितीत हे पुस्तक वाचणं म्हणजे पुस्तकाचा अपमान. शेवटी हवा तसा मानाने हिंदोळा दिला आणि हे पुस्तक माझ्या वाचायच्या खुर्चीपासून ते झोपायच्या गादीपर्यंत सगळीकडे आलं.
पुस्तकाबाबत लिहिण्यापेक्षा हे पुस्तक माझ्याकडे कस आलं ह्याचाही प्रवासही सुंदर आहे. तो मी इथे थोडक्यात नमूद केलाय give it a read! असो, तर असा प्रवास करून आलेलं पुस्तक तशाच मनस्थितीत मी ते वाचावं अस माझ मलाच प्रांजळ वचन होत आणि आज ती योग्य वेळ साधली होती.
ह्या पुस्तकाबद्दल लिहयाचा माझा अधिकार नाही, पण एक उत्तम वाचक म्हणून माझ्या मनाला भावलं, समजलं आणि ज्या अनुभूतीच्या शोधात लेखिकेने स्वप्नातही पाहता येणार नाही असा प्रवास मनोधैर्याच्या बळावर सहज पार केला त्यातुन जे उमजलं ते लिहिण्याचा थोडासा प्रयत्न मी करतेय. ह्यातून, हे पुस्तक प्रत्येक वाचकाने वाचावं आणि स्वतःचा प्रवास सुरु करावा असा माझं ठाम मत आहे!
संसारात स्वतःच्या मर्जीने रमलेली एक मध्यमवयीन महिला. जिचा संसार उत्तम रित्या पार पडताना, आयुष्यात पाहिलेल्या असंख्य घटनेंनी, ती बेचैन झाली, जगण्याच्या ठरवलेल्या चौकटीबाबत अगदी मूलभूत प्रश्न निर्माण झाले आणि त्यातूनच मग तिने जगाला पटणार नाहीत असे प्रयोग स्वतःच्या घरात सुरु केले. स्वतःच्या हुशार मुलींना शाळेतून काढले आणि होमस्कूल ची वाट दाखवली, ती त्यांना कोणी मोठं होण्याकरता नव्हे तर आयुष्य आनंदात जगण्याची सवय व्हावी म्हणून. शिकताना एक उत्तम विद्यार्थी बनता यावे म्हणून. एक ना अनेक तिने चाललेले मार्गच मुळी अस्तित्वात नसल्याने, एखाद्याला तो सगळाचं प्रवास वेगळा वाटावा आणि सोबतच अद्भुत! मुलींना खर खोटं जग समजावं आणि जगातल्या बऱ्यचशा घडामोडी चर्चेपुरत्या मर्यादित न ठेवता त्या पडताळण्यासाठी प्रत्यक्ष तपास करावा ह्या भुकेपोटी झालेली तिची आणि तिच्या कुटुंबीयांची काश्मीर वारी! ह्या वारीत अनाकलनीय अशा अनुभवांची साक्षी होताना तिचे संवेदनशील मन पुन्हा एकदा हेलखावते आणि त्यानंतर तिचा पुन्हा एकदा काश्मीर प्रवास घडतो. पण हा दुसरा प्रवास म्हणजे सोलो-ट्रिप. अगदी तिचा प्रियकर नवराही ह्या प्रवासात तिच्या सोबतीला नाही. काश्मीर ती फिरण्यासाठी नव्हे तर वेगळ्याच अनुभवासाठी जाते तोच हा प्रवास! त्या अनुभवाविषयी लेखिकेलाही सुतराम कल्पनाही नाही किंवा त्याची तिला प्रवासा पूर्वीपासून आसक्तीही नाही. ह्या प्रवासाने तिला उद्या जगातल्या अलौखिक यादीत समाविष्ट व्हावे असा प्रवासापूर्वी आणि नंतरही उद्देशही नाही. तिला फक्त एक स्वैर अनुभव घायचाय आणि सोबत तिला पडलेल्या कोड्यांची उत्तरे. एवढ्या निश्चल ध्येयाने ती तो प्रवास सुरु करते.
प्रवासाची गोष्ट तुम्ही पुस्तकात वाचलाच. पण हे पुस्तक का वाचावं हे ऐकायचं असेल तर ऐका!
कैक वर्ष जे बालमन आपण जगाच्या चौकटीतून बांधून ठेवतो आणि हळूहळू जे चैतन्य आपण गमावून बसतो, ते चैतन्य आणि तेच निर्गुणी बालपण तिला आणि वाचकाला ह्या प्रवासात सापडतं. सीमेचा पाठपुरावा करायला गेलेल्या एका सध्या स्त्रीला सुख, दुःख, मान, अपमान, धक्कादायक, आश्चर्यकारक, मायेचे आणि त्याहून पलीकडे म्हणजे अद्भुद अनुभूतीचे अनुभव ह्यात येतात, ते सगळे क्षण वाचकाला स्वतःच जगल्याचे वाटतात. त्यातून आयुष्यातल्या पुढच्या प्रवासासाठी ती अजून ताजीतवानी होतेच पण त्याहूनही जास्त म्हणजे आयुष्य पाहण्याची नवी दिशा तिला मिळते. माणसाच्या मनांनी ठरवलेल्या फुटकळ सीमेरेखेची कीव येते आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे स्वतःच गुपित उलगडण्याची पुन्हा एकदा मन झेप घेते आणि स्वचा प्रवास एक वाचक म्हणून सुरु होतो, ह्यात ह्या पुस्तकाचं श्रेय सामावलं आहे!
हे पुस्तक अतिशय सुंदर आणि ओघवत्या भाषेत लिहिलं आहे. त्यात उगीच कसलेही संदर्भ वाढवले नाहीत की कमीही केले नाहीत. कदाचित थोडे अदभूत आणि कटू अनुभव शब्दांमुळे थोडे बोथट झाले असाच मला वाटतं. सगळेच काही शब्दात पकडता आले असते तर माणसाने विध्यात्याच्या चमत्काराला चमत्कार म्हटले नसते! ह्यातला एकनेक अनुभव खरा आहे. हे जरी लेखिकेने लिहिलं असल तरी एक वाचक म्हणून आणि लेखिकेची परिचित म्हणून मीही तेच सांगेन. ह्याचं कारण म्हणजे, हे पुस्तक प्रवासानंतर तब्बल साडे आठ वर्षांनी प्रकाशित झाले. त्या दरम्यान लेखिकेचा जो खरा प्रवास झाला, त्यात ती पुरती बदलून गेली. मुळातच हे पुस्तक का लिहावं ह्यापेक्षा नेमक्या कुठल्या प्रेरणेने लिहावं ह्यासाठीचा तिचा तिच्याच मनाशी चाललेला अखंड संवाद आणि अगम्य शोध ह्यामुळे जे साधता आलं त्यासाठी एक वाचक म्हणून आपण खरंच भाग्यशाली आहोत. जगन्नाथ कुंटेच नर्मदे हर हर हे पुस्तक जर तुम्ही वाचल असेल तर थोडंफार मी काय म्हणतेय ह्याचा अंदाज तुम्हाला येईल.
मी हे पुस्तक अवघ्या अडीच दिवसात वाचून संपवले आणि लागलीच माझी प्रतिक्रिया पण लिहिली, इतका सहजपणा आणि ओढ त्यात आहे. हे पुस्तक वाचून झाल्यावर मात्र एकाच वेळी खूप फ्रेश, अचानक आपणही असा लाभदायी प्रवास करावा, नकाश्यावर न सापडणारी गाव पाहावीत, तिथे आपलीच हक्काची जन्मोजन्मीची हरवलेली नाती पुन्हा एकदा आपल्याला भेटावीत आणि पुनहः एकदा हवं तस रस्त्यावरून नाचत गात, डोंगर माथ्यावर उडया मारत हिंडण्याचा अनुभव मिळावा म्हणून थोडीशी लालसाही उद्भवते. कोंडून ठेवलेलं बालमन उगाच डोकावत राहत आणि हट्ट करत राहतं - "तुझेभी ये हक्क है! फिर से अजमाले खुदको। में तो तेरे साथ ही हूं।" जर असा हट्ट तुम्हाला करायचा असेल तर ज्याने तुमचा जन्म देऊन कर्म दिले त्यावर एक निखळ विश्वास आणि निरंतर श्रद्धा मात्र हवी ह्याचा दृढ निश्चय हे पुस्तक वेळोवेळी देत राहत.
छोटेसे मनोगत - पुस्तक वाचताना ते किती वेळात पूर्ण करायचं असलं काहीच माझ्या मनात नव्हतं. फक्त एवढंच वाटत होत, खूप दिवस झपाटल्यासारखं काही आपल्या आयुष्यात होत नाही, तर एखाद्या वेगळ्या रानवेडीची कथा वाचून तर पाहू. कित्येकदा दुसऱ्याचा प्रवासही आपल्याला बरच काही शिकवून जातो. खूपदा आपण वरच्या रंगला भुलणारे, बऱ्याचदा पुस्तकाच्या जाडीनुसार त्यातले सार ठरवून मोकळे होतो. पण जशी वाऱ्याची एखादी झुळूक आपल्याला ताजीतवानी करू शकते, पाण्याचा एक घोट आपली तृषा शांत करतो तशीच काही पानांची पुस्तकही आयुष्यात साधक परिणाम साधू शकतात. मागच्या दीड महिन्यात नावाजलेली, अमेरिकेत आणि जगात अतिशय गाजलेली अशी पुस्तक मी ज्या वेगाने संपवू शकले नाही, त्यात मागच्या अडीच दिवसातल्या काही तासांतच 'काश्मिरीयत' नावाचे नवे पुस्तक अथ: पासून इति पर्यंत संपवले. त्यानंतर खूपदा विचार केला, आयुष्यातही आपल्याला नेमक्या ह्याच कस्तुरीचा शोध घ्यायचा असतो, ज्यासाठी आपण नुसते वेड्यासारखे धावत राहतो. परिणामाअंती विचार केला तर वाटत जे हवं होत ते सापडलच नाही पण काही गोष्टी अचानक दैवी अनुभवासारख्या पदरात पडल्या. सगळीकडे नंबर्स आणि चढाओढीच्या झेंड्यांनी आयुष्यातला साधा सरळपणा पुसला आणि त्यासोबत शाश्वत उदासीनता मात्र आपण आपल्यासोबतची अखंड सोबती केला. जिथे तिथे स्वतःचे ठसे उमटवताना त्यातले सगळेच 'कालाय तस्मै नमः' असतात हा शाश्वतपणा विसरलो आणि वेड्यासारखे आपण नको ते शोधत बसलो. ह्या पुस्तकाने मला इतका फ्रेश केलं की, पुढच्या टप्प्यावरचा प्रवास करताना मी नेमक्या कुठल्या ऊर्जास्रोतांकडे पाहू ह्याहीपेक्षा कस पाहू हे शिकले. अचानक वाटलं सोपच तर आहे सगळं, फक्त आता जे जमेल तेवढे करूया, आजचा प्रश्न सोडवायची ताकद कमवूया. बाकी अनंत प्रश्न जे उद्भवतील ना उद्भवतील ह्याचीच शंका असताना उगाच आपल्या डोक्यावर बोजा वाहायचा तरी का? नको त्या यशाच्या सीमारेघा रेखाटीत बसण्याची आपली पात्रता नसताना त्या गोष्टीची चेष्टा तरी का करावी? सुप्रिया ताईचे काश्मीर मधले पहिले आणि निघतानाचे शेवटचे पाऊल आपल्याला आयुष्यातले एवढे मोलाचे सार नक्कीच शिकवून जाते आणि अचानक मनात गाण्यांचे सूर कानी पडतात - "दिल ढूँढता है, फिर वही, फ़ुर्सत के रात दिन... "
ह्या लेखिकेचा कणभर प्रवास मी माझ्या पॉडकास्ट वर रेकॉर्ड केलाय. पण जो प्रवास मी रेकॉर्ड करूच शकत नाही तो प्रवास मला अंशभर सुप्रिया ताई सोबत आयुष्याची शिकवण म्हणून मिळावा, हे मी माझे अहोभाग्य नक्कीच समजते!