Friday, April 11, 2025

एक पसरलेली स्वयं-संध्याकाळ...

जवळ येणारा मुलाच्या स्प्रिंग ब्रेक मध्ये एखादा दिवस तरी काहीच प्लॅन न करता त्याच्यासोबत कसा घालवायचा आणि स्वतःला थोडी विश्रांती कशी द्यायची ह्याचा विचार मी जवळ जवळ एक महिनाभर करतेय. पण वाढत्या कामाचा व्याप आणि विश्रांती ह्याच कोडं मला बरेच महिने उलगडत नव्हतं. अचानक एक पॉडकास्ट रेकॉर्डिंग ठरलं, भारतातून अमेरिका दौऱ्यावर असलेले पाहुणे! त्यामुळे मुळातच हाताशी खूप कमी वेळ आणि त्यातून खूप जणांशी भेटी गाठी ठरलेल्या त्याच्यात आमची calendar sync होणं म्हणजे दुर्मिळ योग. पण मला भेटलेले, ह्या वेळेचे पाहुणे थोडे निराळे होते! कामाचा agenda होताच, पण मुळात त्यांचं कामाचं स्वरूपचं माणसांशी नाती जोडण्याचं असल्याने, त्यांनी मला लगेचच एक गप्पांचा कार्यक्रम आपण तुझ्या घरी करू असं सांगितलं,"जमेल तेवढ्याना बोलावं, थोडं एखाद दोन तास तरी भेटू बोलू". ठरलं मग लगेचच त्यांच्या calendar मधली मोकळी संध्याकाळ पाहून आम्ही चक्क बुधवारी गप्पांचा कार्यक्रम घरी करायचा असं ठरलं. 

माझ्या काही ओळखीच्या लोकांना आणि काही वेगळ्या ग्रुप्स वर लागेचच निमंत्रण पाठवले. सोबतच, "ओळखीची पावती लागणार नाही", असा disclaimer असल्याने, घर सगळ्यांना खुले असल्याचे आश्वासन होते. एरव्ही आपण असे कोणाही अनोळखी माणसांच्या घरी उठून तसे जाणार नाही किंवा host म्हणून कधी कोणा अनोळखी लोकांना गप्पांच असं खुलं निमंत्रणही देणार नाही. पण आजचा कार्यक्रम खास होता! आदल्या रात्री असं निमंत्रण पाठवून, अगदी दुसऱ्याच दिवशी काही ओळखीतली तर काही प्रत्यक्ष ओळख नसलेली अशी मंडळी यायला तयार झाली. ज्यांना यायचे होते, अथवा आम्हालाही ते हवे होते असे पाहुणे काही कामाच्या पसारामुळे तर काही मुलांच्या शाळा आणि घर ह्यांच्या कोड्यात अडकल्याने येऊ शकणार नव्हते. त्यांच्या अनुपस्थीतच आजचा हा कार्यक्रम तरीही होणार होता. 

माझ्या कामाला तर ऊत आलेला, एरव्ही माझ्या घरी येणाऱ्या पाहुण्यांसाठी मी आवडीने स्वयंपाक केला असता, पण आज मी खरंच खूप थकलेले होते. म्हणून थोड अघळ पघळ राहायचं ठरवलं. संध्याकाळ साठी जमेल तेवढी ऊर्जा राखायची आणि येणाऱ्या पाहुण्यांशी मनमोकळ्या गप्पा मारायच्या एवढाच एक goal ठेवला. सकाळपासून कामाचा उरक, त्यातून ज्यांच्यावर ज्या कामासाठी अवलंबून राहायचे त्यांनी दिलेली टांग आणि उगाचच नको त्या चाकोरीत स्वतःला बसवायचा अट्टाहास ह्याने मनाचं फुल अगदी कोमेजून गेलेले. अगदी घरी आल्यावर पाहुण्यांना द्यायला basic snacks पण नव्हते, पण संध्याकाळी ६ वाजता कशी बशी मी  घरातून निघाले. उरलेली ऊर्जा राखून संध्याकाळचे जेवण order केले. सगळ्यांना ७ वाजता पोहचायचे निमंत्रण होते. तसे एकामागून एक जण जमायलाही लागले. Appetizer Snacks घेऊन येईपर्यंत, दारात मंदार कुलकर्णी पाहिले, तशी त्यांची ओळख असल्याने थोडा ताण कमी घ्यायचा मी मुद्दाम ठरवला. (स्वभावतः अभाव असणाऱ्या गोष्टीची चेष्टा केल्यासारखा हा आव तर मी आणला होता😏) त्यानंतर तयारीला म्हणून वरती गेले तसे अजून दोन-तीन जण जमले होते, आणि खाली गप्पांचा आवाज सुरु झाला. माझी अगदी लगीन घाईच झाली. लागलीच कसबस आवरुन खाली आले, तस्सा एक ओळखीचा चेहरा समोर आला. सकाळपासूनच कामाचा ताण, त्यात मनाजोगता पाहुणचार पार पडायला अपुरी पडलेली मी, ह्याने जरा ओशाळलेच होते. पण  स्वतःच्या अपेक्षांच नको एवढ ओझं वाहताना दमलेली माझी गाडी त्या व्यक्तीला पाहून अचानक विमानात बसलेल्या स्वारीसारखी विराजमान झाली आणि आनंदाने मारलेल्या त्या मिठीत, माझं मणामणांच ओझं विरघळल होत. तिच्यावर कलिंगड कापायची आणि पाहुण्यांसाठीच्या snacks ची तयारी सोपवून मी आता हलकी झाले होते. कित्ती तरी वर्षांनी अश्विनी गोसावी भेटली, एकाच भागात राहूनही जवळ जवळ ९ वर्षे आमचे एकमेकांच्या घरी पाय लागले नव्हते, कधीकाळी एकत्र कॅम्पिंग करून आम्ही मज्जा केली होती, नातेवाइकांच्यात घरी दिवाळी गणपती असेच भेटत होतो, रोजच्या आयुष्यातला समांतरित प्रवासात हरवलेले आम्ही, आज खूप वर्षांनी फक्त गप्पा मारायला एकत्र आलो होतो. त्यानंतर मग हरवलेली ऊर्जा मला सापडली होती. मग आला मिलिंद कुलकर्णी, एक प्रसन्न, कलात्मक आत्म्याचा आनंदी चेहरा, सोबत छान फुल घेऊन आला आणि मला एकदम हर्षवायूच झाला. (मी एक खास blog मिलिंद कुलकर्णींचा राखून ठेवलाय, जेव्हा हुक्की येईल तेव्हा तो लिहिला जाईलच!) एकामागून एक सगळे येत होते. ओमीला कपडे काढून देण्यासाठी मी बेडरूम मध्ये गेले, तेवढ्यात आजची सत्कार मूर्ती आणि उरलेले सगळे पाहुणे येऊन ठेपले.  

आजची सत्कार मूर्ती म्हणजे, नविन काळे (स्वयं talks चे संस्थापक आणि सहचालक, मुंबई,भारत). गप्पा, गाणी आणि सोबतच स्वयंचा पसारा कसा वाढवायचा ह्यासाठीच्या चर्चा रंगणार होत्या. 'नविन' तसा 'नवीन'! पण जे कोणी त्याला भेटले असतील ते सांगतील, अगदी जुना खर्राखुर्रा दोस्त भेटल्याचा आनंद तुम्हाला त्याच्या सोबतीत सापडतो. पाहुणचाराच्या सगळ्या व्याख्या तुम्ही गुंडाळून त्याला भेटलात तरच त्यातला खरा 'नविन' आणि खोटा 'नवीन' (😉) ह्यातला भेद तुम्हाला दिसेल. आधी उगाचच आपण गप्पांची सुरुवात करायला नको म्हणून, मी मिलिंद सोबत पुस्तक देवाण-घेवाण कार्यक्रमात रमून गेले. थोड्या वेळाने अमेय अवघडल्या सारखा आला, म्हणाला कार्यक्रमाची तू आता सुरुवात करून दे, नाहीतर उशीर होईल. म्हणून मग सुरुवात केली, नविन आणि स्वयं talk चा परिचय करून दिला. त्यानंतर नविन ने सगळ्यांना परिचय करून द्यायला सांगितला आणि हळूहळू एकमेकांना न ओळखणारे सगळेच आम्ही खूपच परिचित वाटू लागलो. सगळ्यांना आपापसातले हृद्य संबंध सापडले होते (काही शेजारी आज पहिल्यांदा तर काही खूप वर्षांनी एकमेकांना इथे भेटले!), परिचय आणि त्यासोबत येणार फाफट पसारा ह्यात आम्ही सगळे रमून गेलो, सोबत स्वयंच्या रचनेपासून ते विस्तारपर्यंतच्या चर्चा घडल्या. एव्हाना ९ वाजले होते, शुभदा मामीने जेवणाची ताट भरायाला सुरुवात केली, काही जणांनी मात्र रोजच्या आयुष्याला शरणागती पत्करून, कार्यक्रमाच्या दुसऱ्या पर्वातून माघार घेतली होती. 

उरलेले रसिक गाणी आणि वायफळ गप्पासाठी आता सज्ज होते. श्रीरंग बगे ने दुसऱ्या पर्वाचा "श्री"गणेशा  केला,  अरुण दातेंच्या अफलातून भावगीताने सुरुवातीचा "सा" लागला आणि मराठी मनाच्या भावविश्वाने रोजच्या आयुष्यातला सगळ्या कटकटींना राम राम ठोकला! एका मागून एक सगळ्या गायकांनी सूर लावले, सोबत नविनने माहित नसलेल्या गाण्यांचा इतिहास भूगोलही सांगितला. अचानक सुरमई शाम ह्या गाण्यावर कोणालाच परिचित नसलेले, शांताबाई शेळके ह्यांनी लिहिलेल्या गीताची ओळख नविनने  सगळ्यांना करून दिली. 

मग एका मागोमाग एक अशी अलिबाबाच्या गुहेतली गाणी बाहेर येऊ लागली, कधी गझल तर कधी नवीन गाणी. कुठल्याशा टप्प्यांवर ऐकायची सोडलेली गाणी आता नव्याने अर्थ सांगू लागली! घरी आलेली मुलं आणि आमचा ओमीही आता खेळण्याच्या खोलीतून आमच्या जवळ रेंगाळायला लागले. अचानक नविनच्या हलक्या फुलक्या लेखांच अभिवाचन सुरु झाल, त्याने आता पर्यंत प्रकाशित न झालेला "गप्पा" हा लेख वाचला (गप्पांवरचा रंगलेला हा फड मिलिंद कुलकर्णीकडे सापडलाच!) 

आणि का कुणास ठाऊक सगळ्यांना अचानक विश्रांतीचा खजिनाच सापडला. हरवलेले साधे प्रसंगच कसे आपल्याला श्रीमंत बनवतात ह्याची पोचपावती आम्हाला मिळाली. त्या लेखाने खरंतर आम्हाला श्रीमंत केलं.  इतकं की आता आम्ही मनात येईल तसे सगळेच आपले-आपले लेख वाचू लागलो होतो, अचानक मिलिंद ने त्याची हिंदीमधली अतिशय गहन अर्थ असलेली कविता सादर केली, त्याच्यामागचा इतिहास आणि प्रतिभेची तुमच्यावर झालेली कृपा ह्याची सांगड घालता-घालता, आता आम्हीच नविनच्या "गप्पा" ह्या लेखामधली ठळक चित्र झालो होतो. 
दिवे मंदावत होते आणि आमच्या अंतर्मनाच्या ज्योती आता अधिकच उजाळत होत्या. नविनला भेटलेल्या काही माणसांचा शोध आम्हाला लागत होता, त्याचबरोबर त्याच्या आणि आम्हा सगळ्यांच्या आयुष्यातले काही नगण्य तर काही अमूल्य क्षणांचे आम्ही साक्षीदार होत होतो. गप्पांचा आलेख महाभारतापासून ते अद्ययावत तंत्रज्ञानानापर्यंत भरारी घेत होता. भविवष्यातील गप्पांचा इतिहास इथे घडत होता😁. 
शेवटी एका हलक्या फुलक्या "फोडणीची पोळी" ह्या त्याच्या खमंग लेखाच्या  अभिवाचनाने नविनने गप्पांची सांगता करायचा निर्णय घेतला. तो लेख वाचताना खर तर आम्ही सगळेच फोडणीची पोळी कधी करायची किंवा खायची ह्यावर मनात आराखडे रचत होतो हे त्या लेखकाला (नविनला ) अभिप्रेतही नसेल! मग पुन्हा एकदा "फोपो" वरच सगळ्यांचं किती प्रेम आहे ह्याचे किस्से ऐकले, आणि डुलत असणाऱ्या माझ्या नाईट ड्रेस मधल्या मुलाने आम्हाला झोपायचा इशारा केला. 

पाहुणे मंडळी आता आपापल्या घरच्या दिशेला पांगली होती. आम्ही दोघे खूप ऊर्जेने आता खाण्याचा उरला सुरला पसारा गाणी गुणगुणत आवारायाला लागलो होतो. 

बारा वाजून गेले होते. गादीवर पडल्या पडल्या आम्ही दोघेही, कित्येक दिवसात हरवलेला तजेलपणा अचानक एवढ्या एका छोट्याशा स्वतः च arrange केलेल्या औपचारिक कार्यक्रमाला अनौपचारिक रूप द्यायच ह्या हेतूने, कधीही न भेटलेल्या पाहुण्यांना एकत्र आणून, अगदी weekday च्या कचाटीत असताना कसा काय मिळाला, ह्या संकल्पनेने उगाचच हसत होतो! आठवत होते ते पाहुण्यांचे निघतानाचे अधिकच उजळलेले चेहरे, पुन्हा अशा गप्पांसाठी 'नविन' नसतानाही आपण नक्की भेटू अशा झालेल्या आणाभाका आणि "नविन" नामक आमच्या आयुष्यात आलेलं एक हलकं फुलकं रसायन!


----------------------------------------------------------------------------------------------------------------------------

पॉडकास्टमुळे अनेकदा स्वर्गसुखासारखे अनुभव मला मिळतात. पण हा एक पाहुणा – जुना की "नविन" 😉 सांगणं कठीण आहे. मात्र माझ्या या आनंदयात्रेला पुन्हा एकदा नव्याने दिशा देऊन गेला.
त्याची भेट काहीतरी वेगळंच देऊन गेली… नेमकं काय, हे शब्दांत मांडणं कठीण आहे. पण हो! त्याने मला एक श्रीमंतीचा मंत्र दिला, "जे हवं आहे ते कर, जरी ते वायफळ वाटत असलं तरी!" हा मंत्र त्याने इतक्या सहजतेने, आणि ठसठशीतपणे माझ्या मनावर कोरला ना, की आज, खूप महिन्यांनंतर मी सगळं काम बाजूला ठेऊन, मराठीत एक चक्क ब्लॉग लिहिला. आणि त्याहीपेक्षा खास म्हणजे, आता आठवड्यातला एक तास 'वायफळ' गोष्टींसाठी राखून ठेवायचा आणि त्यासाठी माझ्या कॅलेंडरमध्ये मी चक्क तो तास मार्कही केलाय.
आता उमजतंय… वेळेने श्रीमंत असणाऱ्यांचा आपल्याला हेवा का वाटतो ते. स्वतःसाठी जगणं किती कठीण आहे? आणि स्वतः चा आवाज गावसण त्याही पेक्षा कर्मकठीण.
तुम्ही एखादा तरी असा प्रयोग केलाय? मला comments मध्ये नक्की सांगा!
------------------------------------------------------------------------------