Monday, September 30, 2024

आमचा ST चा प्रवास!

ओमीची अमेरिकेतील उन्हाळी सुट्टी आणि भारतातला पावसाळा ह्याचा उत्तम संगम साधून आम्ही भारतात सहकुटुंब सहपरिवार जायचे ठरवले. त्यातून काही प्रवास सहकुटुंब, काही प्रवास एकट्याने तर काही ओमी सोबत बाबा आणि काही ओमीसोबत आई असे आखले. ह्या प्रवासातील पहिलाच मोठा प्रवास ओमी आणि माझा. त्याला कोकणातल्या काही गावांमध्ये घेऊन जायच ठरलं.


माझ्या आयुष्यातली अतिशय महत्वाची स्थाने म्हणजे, बागडे काका - काकू आणि सुप्रिया ताई ह्यांना भेटायचं होत. सोबत माझी जीवश्च: कंठश्च: मैत्रीण शीतल सोबतीला. 

मला आणि शीतलला थोड्या वेगळ्या पद्धतीने फिरायचं होत पण पावसाळा आणि कोकणातलं महाड ह्या गावाचं एक वेगळच नातं असल्याने प्रवास थोडा आखीव रेखीव असलेला बरा. त्यातून आम्ही दोघी आणि सहा वर्षांचा ओमी असा प्रवास करायचा म्हणजे, सुरक्षितता वगैरे वगैरे सगळ्या गोष्टी कुटुंबाच्या चौकटीत महत्वाच्या होत्या. शेवटी महाराष्ट्र शासनाची शिवशाही (luxury) बस ठीक राहील असे शीतलने सुचवले आणि त्याचे reservation करावे म्हणजे सगळयांनाच आपल्या जाण्याची आणि ठराविक वेळेत पोहचण्याची शाश्वती राहील. त्यातून माझे प्रवासयोग आणि वेळ पाळण्याचे गणित ह्याचा अचूक अंदाज असल्याने, तिने मला रात्रीच दादरला मृदुल काकीकडे (शीतलच्या माहेरी) आपण सगळ्यांनी राहायचं आणि पहाटेची पहिली बस घेऊन जायच असा योग्य तो प्लॅन बनवला. ठरल्याप्रमाणे आम्ही रात्री दादरच्या घरी आलो खरे. (दादरच्या घराचा प्रवासही लिहिण्यासारखा आहे, पण पुन्हा केव्हातरी!) त्यानंतर मग पहाटे ४-४:३० वाजता उठून तयार होऊन पहाटे ६:१५ ची बस पकडायची असं सगळं ठरल होत. रात्री दादर मध्ये पोहचल्यावर शीतलने गुगली टाकली. शिवशाही बस ऐवजी आपल्याला ST चे तिकीट मिळालंय. शीतलच्या हातून चुकून घडलेला उत्तम गोंधळ! बस चा व्यवस्थित अंदाज न घेता, सकाळची पहिली महाडला नेणा-ऱ्या बस चे तिकीट द्या असे सांगून मिळेल ते तिकीट तिने घेतले. तिकीट काढतानाही आरक्षणगृहाचे अधिकारी तिला ३९० रुपये तिकिटाचा खर्च झाला असा सांगितल्यावर तिने ३९० X ३ असे पैसे दिले आणि त्यातूनही पैसे परत आल्यावर आमच्या डेंटिस्टचे दात उघडायला बराच काळ झाला तो पर्यंत ST महामंडळाच्या चपळ कार्यकाऱ्याने तिकीट उरलेले पैसे आपल्या हुशारीचा भरपूर जोर काढून शीतलला परत केले होते. झालं मग म्हणतात ना "जे लिहिले कभाळी ते चुके ना कधी काळी" प्रमाणे आमच्या भाग्यातला ST चा प्रवास आम्ही आनंदाने करायचा असं तिघांनाही ठरवलं. त्यातून ओमीला बसचाच मुळात प्रवास पहिल्यांदा करायचा असल्याने, मला फक्त एकाच गोष्टीच टेन्शन ह्याला बस लागू नये, बाकी तो सब सांभाल लेंगे!




प्रवासाच्या दिवशी, अलार्म च्या आधीच मी आणि शीतल उठून तयारीला लागलो, दोघींचा सकाळचा चहा आणि नाश्ता करून आम्ही ओमीला ५:१५ वाजता उठवून तयार करून घरातून ५:४५ ला निघालो. सकाळी बस स्टेशन पर्यंत टॅक्सीने पोहचलो. ओमीला एकदमच आनंद झालेला कुठेतरी मस्त फिरायला जायचंय आणि शीतल आणि आईसोबत म्हणजे फुल्ल टू धम्माल असणार आहे. त्यातून गप्पा रंगवणाऱ्या आईने अमेरिकेपासूनच मुलाची भक्कम तयार करून आणली होती. त्याला कधी फक्त बाबासोबत तर कधी आईसोबत वेगळ्या गावांमध्ये फिरायचं आणि भारतातल्या कॅम्पिंग चा अनुभव घयायचा अशी पट्टी पढवली होती. पण आमच्या बाबाच्या  भक्ताने (ओमीने) बोरिवली मेट्रॉ स्टेशनलाच बाबाचा निरोप जणू सासरी जात असल्यासारखा घेतला होता आणि माझा उत्साह चिंतेत परिवर्तित केला होता. शीतलला पाहून त्याने अंगात बळ आणलं होत आणि तिला खिशात टाकलं होत, जेणेकरून आपली सगळी गरज शीतल पूर्ण करेलच आणि उगाच ह्या बाईच्या मागे आपण डोकं फोडून घ्यायला नको अशी महत्वाची सोय करून ठेवली होती. काही का असेना पण त्याने माझा उत्साह द्विगुणित झाला होता. एकदम लवकर उठून शहाण्या मुलासारखा आमचा ओमी तयार होऊन स्वतःची बॅग सांभाळत बस स्टॅण्डवर आमच्यासोबत आला. सकाळची ६:१५ची ST ६:४५ ला दादरला आली, तोपर्यंत ओमीने रस्त्यावर राहणाऱ्या मुंबईतल्या जनतेला जवळून पहिल होत, पहाटे उठून कार्याला लागणाऱ्या मुंबईचं दर्शन घेतलं होत, सगळ्यात महत्वाचं म्हणजे बसची वाट पाहणे आणि एखादी बस स्टॅण्डवर आलीच तर ती आपली आहे का नाही ह्याची चौकशी डायरेक्ट बसमधल्या कन्डक्टरशी करायची इतपत हुशारीही कमवली होती. माझा आणि शीतलचा एक हक्काचा गडी तयार झाला होता :) मध्ये मध्ये आम्हाला त्याच्या बऱ्याच प्रश्नांना समोर जावं लागत होत, पण issue escalate करण्यासाठी बस स्टॅन्ड वर कुठे जायचा ह्याचा त्याला अंदाज नसल्याने मग शीतल आणि मी ज्या ऑफिस मध्ये चौकशी करत होतो, ते सगळं पाहून त्याला वाटलं असावं, आपलं कॅम्पिंग बहुतेक स्वप्नच राहणार की काय? पण हाय रे हाय तितक्यात आमची बस आली, ओमीने त्याच जराही अवसान न गाळता नव्या उत्सहाने बस मध्ये शिरायची हुशारी दाखवली, खर तर ह्या मावळ्याला कसला जोर आला होता म्हणून सांगू, मला तर वाटलं रायगडावर ह्याला महाडला गेल्यावर लगेचच न्यावं! 


शेवटी एकदाचे बस मध्ये चढलो. पुढे आमच्या जागांवर स्थानापन्न झालो ते थेट झोपण्याच्या उद्देशाने. पण ओमीची झोप पूर्ण उडाली होती, बसमधला पहिलाच प्रवास, त्यातून ST च्या नव्या स्वच्छ अशा बस मध्ये शिरलो होतो. निळ्या रंगाच्या नवीन कोऱ्या सीट्स होत्या. खिडक्या उघड्या... उघड्या खिडकीच्या बाजूला बसून प्रवासाचा आनंद काही औरच. ओमीला म्हटलं तू बस इथे, तर पट्ठ्या घाबरला. कधी खिडकीच्या उघड्या काचा त्याने तश्या अनुभवल्या नव्हत्या. अमेरिकेत कायमच काचा बंद आणि वेगमान प्रवास. मला म्हणाला, तू बैस इथे मी बाजूला बसतो. कितीतरी वेळ सीटचा बेल्ट शोधत राहिला आणि शेवटी मला त्याने न राहवून विचारला ह्या सीटला बेल्ट कुठेय? मी आणि शीतल दोघीही मनापासून हसलो आणि त्याला सांगितलं इथे नाहीये. तसा ओमी घाबरलाच. साधं कार मधून जाताना आपण बेल्ट लावतो पण एवढ्या मोठ्या बस मध्ये बेल्ट नाही? ज्या पद्धतीने तो बस मध्ये सीटचा बेल्ट शोधत होता, त्या पद्धतीने मला समजलं की ह्याला ही बस म्हणजे विमानच वाटत आहे, फक्त कॅम्पिंगला नेणार वेगळं जमिनीवरच विमानं! घ्या :)  मुंबई ते नवी मुंबई प्रवास ओमीने मला घट्ट पकडून केला, कारण बेल्ट नाही आणि ड्राईव्हर काका पण सकाळच्या रस्त्यावरून मस्तीत गाडी चालवायचा आनंद घेत होते. मध्येच कंडक्टरने आमची तिकीट तपासणी केली, आणि आम्हा दोघींच्या तिकिटावरच्या वयाचा आणि प्रत्यक्षात दिसण्याचा आणि वागण्याचा अगदीच संबंध नसल्याने त्यानेही आमच्या ओमीची जबाबदारी घायची मनोमन शपथ घेतलेली. झालं तर मग, आमचा प्रवास आता सुखरूपचं होणार होता! आम्ही ओमीला धीर देण्याऐवजी कंडक्टर ओमीला धीर देत होता, हळूहळू ओमीलाही खात्री झाली हा प्रवास नॉर्मल आहे. तसतसा, तो खिडकीतून बाहेर माझ्या बाजूलाच बसून पाहू लागला. हळूहळू माझ्या मांडीत येऊन स्थिरावला आणि कोकणातल्या डोंगररांगांनी त्यालाही भुरळ पाडायला सुरुवात केलेली. छोटेसे झरे ते धबधब्यांचा आनंद लुटत, मस्त गप्पा मारत माय लेक रमून गेले. 

मध्येच ओमी शीतलला खिडकीच्या बाजूने हाक देऊन तिच्यासोबत खेळत होता तर कधी सीटवरून. मध्येच लपाछपी तर मध्येच टिवल्या बावल्या.थोड्यावेळाने शीतल दमली आणि झोपली, मग तर ओमीच्या अंगात भरपूर मस्ती आली, खूपदा तिला झोपेतून ऊठवायचे प्रयत्न केले, मग मात्र शीतलने अगदीच मान टाकली आणि ओमीने स्वतः कसा प्रवास एन्जॉय करतोय ह्याकडे लक्ष द्यायला सुरुवात केली... 
अचानक वळणा वळण्याच्या रस्त्यावरून जाताना, हिरवीगार डोंगररांगा अनुभवताना त्याला खूपच आनंद झाला, मला म्हणाला,"थँक्यू मम्मा, आता आपण कॅलिफोर्निया मध्ये आलो पण!" मला आनंद झाला की ह्यालाही कोकण आणि कॅलिफोर्निया ह्याचा जवळचा संबंध पटला पण रिऍलिटी समजावताना, एखादे गाव दाखवताना त्याचे असंख्य प्रश्न हाताळताना हाताशही झाले. कॅलिफोर्निया जगातल्या फर्स्ट वर्ल्ड कंट्रीचा भाग, पण भारतासारख्या विकसनशील देशात फर्स्ट वर्ल्ड कंट्री बनवताना होणारा बराचसा सृष्टीचा ऱ्हास, आणि बाकी बऱ्याच गोष्टींचे अनुमान मनोमनी बांधताना खूप खंत वाटत राहिली. जमेल तसे चांगल्या बाजूने मी त्याच्या प्रश्नांना उत्तरे दिली. कोकणचे उत्तम चित्र आणि भारताचे उत्तम चित्र त्याच्या मनामध्ये रेखाटलेही. पण तो पण तर सगळं निरीक्षण करतच होता. अनुमान काढण्याइतपत त्यालाही बुद्धी आहेच, त्यामुळे उगाचच क्षितीज्याच्या पल्याड जे खरे चित्र आहे त्याचा अंदाज देणेही भाग होते. मग शेतकरी कसा असतो, ते गरीब का राहतात वगैरे प्रश्नांची उत्तरे मला त्याला अर्थशास्त्राच्या दृष्टीने देणे मात्र कठीण गेले. 

पावसाळी हवा, ढगाळ हवामान, त्यात कुठल्या माणसाला सूसू लागणार नाही? झालं आमच्या चिरंजीवाला सूसू लागलीच. मला म्हणाला,"चल बसच्या मागच्या सीटवर", मी: "अचानक मागे का जायचंय?" ओमी :" मला रेस्टरूम मध्ये जायचंय." मी:  "रामाSSS! अरे ह्या बसमध्ये रेस्टरूम नाहीये, आता थांब नेक्स्ट स्टॉप येईपर्यंत." ओमी : "कस नाहीये? मग ह्या बसमधले सगळे कुठे सूसू करतात?" जमेल तस त्याच तोंड बंद करत, त्याला सांगितलं जस आपल्या कार मध्ये नाहीये तसंच. आता आपण मध्ये थांबू तेव्हा जाऊ. O.K. म्हणाला. आता पुढची पंचायत मला माहीत होती. पण आता जे आहे ते आहे, एवढ्या सगळ्या प्रवाशांमधलेच आम्ही एक प्रवासी. जगातल्या अनुभवांना आपण फिल्टर लावायचा म्हटला तर लावता येतो, पण त्याने कैक जणांचे अनुभव नाकारता तर नाही ना येत? आपणही त्यातलच एक व्हायचं असं मनापासून ठरवलंच होत मग आनंदाने सगळं छान आहे असाच त्याला अनुभव द्यायचा. सुप्रिया ताईच्या शिकवणीने मीही आता लेबल लावायचं सोडून दिल होत, तर हा अनुभवही माझी त्यासाठीची एक परीक्षा होती. उगाच कसलाच पुढचा अंदाज न देता, मी आणि शीतल पुढल्या बस स्टॉप वर त्याला शिस्तीत सुलभ शौचालय मध्ये घेऊन गेलो. आश्चर्याची गोष्ट म्हणजे, ह्यावेळेस आम्हाला बऱ्यापैकी स्वच्छ सुलभ पाहायला मिळाले. स्त्रियांच्या कक्षात ओमीला नेले होते, त्यामुळे तो तसा काही फारसा आनंदी नव्हता त्यातून एक-दोन अजब दृश्यानं तोही गार झाला होता. शेवटी जेव्हा गरज पडते तेव्हा माणूस फिल्टर सोयीस्कर पणे काढतोच म्हणा :) एकदाचा सूसू कार्यक्रम आटोपला आणि आमचा हिरो पुन्हा एकदा नवीन प्रवासाला सज्ज झाला. 

पुढच्या टप्प्यावर, आम्हाला आता अजून धबधबे पाहायचे होते, नवी गावं पाहायची होती, नवे भाजीवाले आणि टुमदार घरही पाहायची होती. मध्येच स्टॅण्डवर, फेरीवाले चढले. कोणी पॉपकॉर्न घेऊन तर कोणी चिकी आणि लिमलेटच्या गोळ्या घेऊन, कोणी कापलेली काकडी घेऊन तर कोणी चणे शेंगदाणे घेऊन, कोणी बटाटावडा घेऊन तर कोणी बिस्कीट, वेफर्स आणि आलेपाक घेऊन. हे सगळं पाहून ओमी तर चक्रावलाच. त्याला सॉलिड वाटत होत, आधी काकडी, मग लिमलेटच्या गोळ्या आणि नंतर चिक्की सगळं आवडीने शीतलकडून मागून घेतल. लिमलेटच्या गोळ्या तर खजिना मिळाल्यासारख्या तो खातो. काकडी तर वेळ प्रसंगी कोल्ह्यासारख्या युक्त्या लढवून कोणाच्याही हातातून सोडवून खाईल. साधे वेफर्स पण भरपेट खाल्ले. मग शेंगदाणा चिक्कीही  झाली.  शीतल ला एकदम नवल वाटलं, कारण चॉकलेट्स हा खात नाही पण लिम्लेटच्या गोळ्या आणि फ्रुट कॅंडींवर त्याने जसा आडवा हात टाकला होता ते पाहून तिला अंदाजच बांधता येत नव्हता. अमेरिकेतून आम्ही मोठी मोठी चॉकलेट्सची पाकीट आणतो पण ह्याच्यासाठी मात्र भारतातून लिम्लेट आणि फ्रुटकँडी घेऊन जातो हे कोणालाही सांगितलं तर उगाच अतिशयोक्ती वाटावी पण प्रत्यक्ष पहिल तेव्हा तिला खात्रीच पटली. 


थोड्या वेळाने पुन्हा खिडकीतली गंमत चालू झाली, पण आता मात्र ओमी धिटावला होता, हळूहळू खिडकी जवळची सीट त्याने बळकावली होती. एकटाच निसर्ग अनुभवत होता, कदाचित इतका सुंदर निसर्ग नि:शब्द अनुभवायचा त्यालाही छंद लागला होता. मीही, जरा निवांत झाले होते आणि अचानक माझा आणि शीतलचा हलकासा डोळा लागला होता. 

पुढे मग अजून भुकेची वेळ, आणि गाडी जेवणासाठी थांबणार होती. कंडक्टर बेल मारून सगळ्यांना म्हणाले, गाडी जेवणासाठी  १५ मिनिटे थांबेल, तसा ओमी मला उठवायला लागला, "मम्मा, नीट बस आता आपल्याला जेवण मिळणार आहे." मला काहीच कळेना, खडबडून जागे झाले आणि त्याला विचारल, "काय?" ओमी: "अग कंडक्टर crew आपल्याला आता जेवण देणार आहे, sit straight and upright". मी अगदीच गार झाले, ह्या पठ्ठयाला ही बस खरंच विमानसेवा वाटत होती, हा अंदाज एकदम खरा ठरला. "ST बसला विमान समजणारा हा पहिलाच!" मी आणि शीतल पुन्हा एकदा खळखळून हसलो. शेवटी त्याच्या आनंदावर विरजण घालून त्याला आम्ही आणलेली त्याची जॅम sandwitches दिली, थोडा अजून खाऊ दिला, पाणी दिले. आणि सुलभ मध्ये सूसू कार्यक्रमाला नेले. ह्यावेळी मात्र तो जेन्ट्स सेक्शनमध्ये एकटाच गेला आणि आलाही. सुलभ ते बस मधल्या रस्त्यातल्या चिखलात हुशारीने उड्या मारत बस मध्ये बसला. पुढच्या प्रवासाला, आम्ही सज्ज झालो. 


आता आम्ही माणगाव सोडले होते, ह्यापुढे मोठे ब्रेक नव्हते, आणि पुढला स्टॉप महाड आता एक- दीड तासावर होता. तोपर्यंत बराच प्रवास आनंदाने पार पडला होता. आता ओमीला झाडांना खत घालण्यासाठी पण सूसू करायची सवय शीतलने लावली होती. एकंदरीतच ह्या प्रवासाने त्याला पुढ्यच्या भारतातल्या प्रवासासाठी तयार केले होते. पण अजून खूप काही शिकायचं असतंच ना... तसच काहीस झाल! 

सकाळीच उठून आम्ही निघाल्याने सकाळचा मोठ्ठा कार्यक्रम ओमीचा बाकी होता, त्यातून फ्रुटी प्या,मध्येच खाऊ खा ह्या सगळ्यात पोटाने नकारघंटा वाजवायचा कार्यक्रम सुरु केला... आता नवी पंचायत. फर्स्ट वर्ल्ड कंट्री मध्ये राहणाऱ्या मुलाला, कधी रांग लावून पोट साफ करायची वेळच आली नव्हती, त्यातून आली रे आली की आमची सोय कुठेतरी व्यवस्थितच होते, त्यामुळे आलेल्या गोंधळाला थांबवायचीही एक सवय असते, त्याचे शिक्षण पुस्तकात वाचून थोडेच मिळते? ते तर अनुभवाचे शिक्षण. जगाच्या पाठीवर तुम्हाला अनंत शिक्षणाचे धडे देणारे क्लासेस मिळतील पण नेमके काही क्षणात आवश्यक असणाऱ्या हुशारीचे शिक्षण तुमचे तुम्हालाच घावे लागते. त्यातलेच हे एक! पोटाची गरज ओळखून ओमी मला हळूच म्हणाला, "आता मला जायचंय". आता बोला! मी पण घाबरले, कारण हे सगळं गणित जमवायचं कस. एरव्ही आम्ही ओमीचे आईबाबा, ओमीने असा आवाज दिल्या दिल्या सोयी करण्याची जादू करत असलो तरी आता मात्र, मदतीची हाक कंडक्टर ला मारल्याखेरीज पर्याय नव्हता. कंडक्टरला आणि त्याचबरोबर आमच्या आजूबाजूच्या प्रवाशांना गंभीर परिस्थितीचा अंदाज आला. कंडक्टर कितीही वाटून सुद्धा वळणा वळणाच्या रस्त्यावर एवढी मोठी ST उभी करण्याचा धोका पत्करणारा नव्हता. शेवटी शीतलने ओमीला मोठे श्वास ह्या वेळी कसे घ्यावेत, आताच कसे अंकगणित उपयोगी आणावे, ह्यासारखे हुशारीचे शिक्षण द्यायला सुरुवात केली. सोबत मला पण आता आपल्या अनलिमिटेड डेटा प्लॅन चा उपयोग मुलांच लक्ष दुसरीकडे वळवण्यासाठी  कसा करावा ह्याचे धडे दिले. शेवटी अजून एक-दीड तासाचा प्रश्न होता, तो सोडवण्यात आम्ही दोघीनींही आमची सगळी हुशारी कामी लावली आणि ओमीची हुशारी patience ह्या एका तत्वाला आत्मसात करण्यात लावली. शेवटी एकदाचे महाड आले, आणि आम्ही दोघीनीही जीव की प्राण एक करून बॅगा घेऊन धडाधड ओमीला उचलून गाडीतून  उड्या मारल्या. महाड मध्ये बागडे काका घ्यायला आले ते पण रिक्षा वैगैरेची सोया करुनच. एरव्ही शिवाजी चौकातून आम्ही घरी चालत  गेलो असतो, पण आज धावत, रिक्षेने पोहचलो होतो. बस प्रवाशांनीही आम्हाला सुटकेचा निःश्वास टाकून निरोप दिला होता आणि ओमीने घरी गेल्या गेल्या आपला गड सर केला होता. त्यांनतर, 'ओमीचा विजय असो', अशा आरोळ्या आम्ही सगळ्यांनीच मनोमन ठोकल्या होत्या. शेवटी परिस्थितीने मिळालेल्या शिक्षणाने सगळेच खुश झाले होते आणि आयुष्यभरातले महत्वाचे शिक्षण आत्मसात करण्याचे कसब आता ओमीला उमगले होते. 

असा आमचा पहिला ST प्रवास सफळ संपूर्ण जाहला, आणि आम्ही अजून गावांतून प्रवास करायाला तयार झालो, पुढे पुनीर ह्या श्रीवर्धनच्या खेड्यातून मुंबईला परत येताना आम्ही बिनधास्त STतून यायचा निर्णय घेतला तेही reservation मिळालेले  नसतानाही, त्यातली गंमत पुढल्या भागात! 

मला मिळालेली शिकवण -  "आपण शिक्षण घेऊन हुशार होऊन, थोडसे पैसे कमावल्यावर, पालकत्वाच्या गप्पा मारून मुलांना खूपच कक्षेतल्या आयुष्यात गोंजारायाला पाहतो, पण त्याहीपलीकडे परिस्थिती नावाचा गुरु असतो, हे आपण बऱ्याचदा विसरतो. शेवटी तोच गुरु आपल्या मुलांचा खऱ्या अर्थाने confidence वाढवू शकतो. आपण फक्त त्यांना त्याही परिस्थितीला समोर जाण्याचं बळ द्यायला शिकवायला पाहिजे आणि असे अनुभव घेताना त्यांच्यासोबत आपणही त्यांना सांगायला पाहिजे, हा पण एक आपल्याच आयुष्यातला भाग आहे, त्यालाही आपलंस करण, एक अनुभव आहे आणि हेच खर शिक्षण आहे." 

     

 

Saturday, June 8, 2024

Mr. Fixer आणि ओमी!

बालवर्गातला शाळेतला शेवटचा दिवस आणि मग ओमीची सुरु होणारी पहिली ऊन्हाळी सुट्टी!
नवव्या महिन्यापासून डे-केअर मध्ये असल्याने सुट्टी ही कल्पना त्याला जितकी नवीन तितकीच आम्हालाही. त्यामुळे सुट्टीचा आनंद काय असतो ह्याची त्याला सुतराम कल्पनाही नव्हती. ह्या उलट आता अजून मोठ्या शाळेत जायचे ह्याचाच त्याला कौतुक! पण शेवटच्या दोन आठवड्यात जेव्हा त्याच्या लक्षात आलं की ज्या शाळेत आपण इतके मनापासून बागडलो, त्या शाळेला आता भेट नाही ह्याचं त्याला काहीतरी तरी नक्कीच खुपत होत. शब्दात मांडता येत नव्हतं एवढंच! शिवाय शाळेतले शेवटचे दोन-तीन आठवडे अगदी मजेत चालले होते. शेवटचे cultural कार्यक्रम, तुफान पार्ट्या आणि रंगिरंगीबेरंगी वेशभूषा दिवस ह्याने शेवटचा आठवडा पण नटत होता, ह्याने त्या बाल मनांवर काहीतरी उमटत होत हे नक्की. शाळेतल्या लंच टीचर्स पासून ते ऍडमिन पर्यंत सगळ्यांनीच मुलांना छान छान भेटवस्तूही दिल्या होत्या. 
अगदी शेवटच्या दिवसाची तयारी चालू होती, मुलाबरोबर आमचाही शाळेचा नवा प्रवास होत होता, आणि आपल्या बालवर्गातल्या बाई मलाही तितक्याच स्मरत होत्या.

अचानक मला वाटलं, जर इतिहास बदलता आला असता आणि थोडं time machine मध्ये बसता आलच असतं, तर मी बालवर्गाच्या शेवटच्या दिवशी नेमकं काय केलं असत? ह्या विचारातच मी ओमीला विचारलं, शाळेचा उद्या शेवटचा दिवस, परत ह्या शाळेतले टीचर्स तुला भेटणार नाहीत, मग तू उद्या नेमकं काय करशील त्यांच्यासाठी? तसा तो म्हणाला, मी छान कार्ड बनवतो मेसेज लिहितो आणि तू आणि मी जाऊन आपण त्यांना गिफ्ट्स आणूया. 
तसा दोन आठवड्यापूर्वीच त्यांचा teachers appreciation week  झालेला, त्यामुळे शाळेच्या नियमातला कार्ड-डे, फ्लॉवर्स डे, वेगवेगळ्या टीचर्ससाठीचा गिफ्ट्स-डे असं सगळं काही साग्र संगीत पार पडलेलं. म्हणून मग त्यालाच विचारलं कुठली गिफ्ट्स द्यायची आता? हे डिपार्टमेंट आईच असल्याने मुलानेही बाबासारखी माझ्यावर छान जबाबदारी सोपवली. मलाही फार काही सुचत नव्हतं म्हटलं आधी घरातला खाऊ संपलाय तो आणायला जाऊ. Trader Joes ह्या आमच्या आवडीच्या दुकानात माझी आणि ओमीची यात्रा वळली, आणि कलिंगड घ्यायचे ह्या हट्टापोटी आम्ही बाहेरच्या आवारात उभे राहिलो, तर तिथे मस्त indoor plants दिसले, मी ह्या season ला आपल्या घरी कुठली नवी फुलझाडं आणता येतील ह्या विचारात, तो section न्याहाळत असताना, नेमकं ओमी म्हणाला आपण हेच घेऊया टीचर्स साठी. वाह! ही कल्पनाच मला छान वाटली. मुलांचे हट्ट पुरवण्यात एक वेगळीच मजा असते, त्यातून असले हट्ट म्हणजे आईचा थोडासा अहंकार सुखावणारा. 
वर्गातल्या दोन बाई, लंचच्या दोन अशी ४ फुलझाडं मी घेतली, आणि मग ओमी एकेक करून जवळ जवळ १५ फुलझाडं घेऊन आला. मी म्हटलं एवढी? तर त्याने ऍडमिन, प्रिन्सिपॉल पासून ते drive-through ला असण्याऱ्या सगळ्यांसाठी फुलझाडं घेतली होती. तरीही मला एक दोन हिशेब लागले नाहीत म्हणून त्याला विचारलं सगळ्यांची नाव सांग, त्यात त्याचे गाण्याचे शिक्षक, स्पॅनिश टीचर्स पासून ते librarian आणि Mr. Fixer होते. 

शाळेत जाऊन वर्ष झालं होत, तरीही मला ह्याच्या शाळेत librarian Mr. Erik नावाचा टीचर आहे आणि शाळेचा Mr. Fixer Ken हा सुपरहिरो आहे हे माहीतच नव्हतं! Mr. Erik मुलांना गोष्टीची पुस्तकं वाचून दाखवतो तर Mr. Ken हा शाळेचा handyman आहे. वर्गातल्या नळ दुरुस्तीपासून ते electrician म्हणून तो सगळ्या जबाबदाऱ्या पार पडतो. प्रत्येक वर्गात ह्याची गुरुवारी न चुकता फेरी असते आणि सगळ्या गोष्टी तो तपासून पाहतो, ह्याचा शोध मला शाळेच्या शेवटच्या दिवशी लागला होता. 
तसा माझा चिरंजीव मितभाषी आणि सुज्ञ आहे, वेळ पडेल तेव्हा आणि त्याला जरुरी वाटेल तेव्हा आणि तेवढीच तो माहिती आम्हाला पुरवतो. उगाच नको एवढा data processing ला का द्यावा, ह्या पक्क्या विचारांचा तो कार्टून! त्यामुळे बरचसे साक्षात्कार आम्हाला होतच असतात. पण इतका की आम्हाला त्याच्या शाळेत गोष्टीचा तास कोणी वेगळं घेत; ह्याच मात्र आश्चर्य नक्कीच वाटलं आणि एक आई म्हणून आपण कमी चौकशी करतो का ह्याचाही नवलही  वाटलं. असो! तर Mr. Ken बद्दल बोलताना, ओमीचा अभिमान पाहून मला कौतुक वाटलं. त्याच्या कथा सांगताना लक्षात आल, की हा Mr. Ken ह्याला magician भासतो. तो सगळं करू शकतो असा विश्वासही त्याला वाटतो. सगळी मुलांची गॅंग त्याच्याकडे सुपरहिरो ह्याच दृष्टीने पाहते, असा मला ओमीच्या बोलण्यावरून अंदाज आला. त्याला म्हटलं वाह! मग त्याला तू उद्या काय सांगणार, तर म्हणाला, "I will miss you Mr. Ken!" शेवटी एवढी सगळी फुलझाडं cart मध्ये टाकून checkout काउंटर ला वळलो. checkout counter वर attendee ने विचारलं एवढी सगळी सेम फुलझाडं? तर चिरंजीव एकदम कॉलर ताठ करून म्हणाले माझ्या सगळ्या टीचर्स साठी. तो पण कौतूकाने पाहत राहिला. 

घरी आल्यावर हा सगळा प्रकार अमेयच्या कानी घातला, आणि म्हणाले एकदम धन्य फीलिंग आलय मला. ओमीने लक्षात ठेवून Mr. फिक्सर साठी गिफ्ट घेतलं. अभ्यासात झेंडे लावो ना लावो, आयुष्यातली साधी management त्याला नक्कीच जमेल, जी शिकण्यासाठी कैक C-suit management चिक्कार पैसे मोजते. मुलांचा हा निरपेक्ष कर्मभाव आणि विषमता ह्या भावाशी निरोळख हे साधं गणित कधी हरवायला लागत ह्याच्या विचारात आम्ही गुंतून गेलो. हे आपण कस जपायचं ह्याच्याच विचाराने मनाने हिय्या करायला सुरुवात केली. करिअर च्या नावाखाली, सॅलरी स्लीप च्या ग्रेड मध्ये जेव्हा सगळे माखते त्यावेळी कामाचे दर्जा ठरतात आणि अचानक सुपरहिरो वाटणारा माणूस एकदम न गणत्या category मध्ये समाविष्ट होतो. त्याचं काम तो चोख करत असला आणि त्याला रिप्लेसमेंट कठीण असली तरीही! अचानक मला सुप्रिया ताईसोबत केलेला पॉडकास्ट आठवला, ज्यामध्ये ती सचिन देसाई ह्यांचं एक village मॉडेल मुलांना काही विशिष्ट पद्धतीची काम कशी शिकवावीत आणि का करावीत हे शिकवण्यावर भर देते. शिवाय विशिष्ट कामं ही त्याच माणसांकडून शिकावित ज्यात त्यांना प्राविण्य आहे. आपण शाळेतले शिक्षकही काही विशिष्ट प्राविण्य मिळवलेले घेतो, मग उत्तम आणि efficiently शेती कशी करावी हे तर एखाद्या उत्तम आणि seasoned शेतकऱ्याकडूनच शिकायला पाहिजे ना? कामांच्या किंमती ठरल्या आणि  काळासोबत कित्येक न विकल्या जाणाऱ्या कलाही आता दुर्मिळ होऊ लागल्यात, काही कलाकुसरी तर लोप पावल्यात. त्या जपण्यासाठीचे काही प्रयत्न काही झपाटलेले लोक करता आहेत, ह्या विषयावर आम्ही बोललो होतो तेच एकदम आठवलं. आणि लख्ख प्रकाश पडला. म्हटलं आपण जाणीव पूर्वक एक पालक म्हणून एवढीच जबाबदारी पार पाडायची. कामाचा दर्जा हा त्यातुन मिळणाऱ्या मोबदल्यापेक्षा खऱ्या कामाचा दर्जा हा तेच काम किती चोख बजावले आहे, ह्याकडे मुलाचं लक्ष वळवायचं. बाकी त्यातून तो नेमकं काय घेईल ह्याचे संस्कार आपल्या हातात नाहीत, कारण आजूबाजूचं जगही त्याला काही शिक्षण देतच राहील, ज्याची सूत्र आपल्याला हातात घेताच येणार नाहीत. 


ह्या सगळ्या गडबडीत आणि गिफ्ट arrangement मध्ये ओमीची झोपायची वेळ झाली, कार्ड्स अजून सगळी बाकी होती, झोपण्यापूर्वी आम्हा मायलेकाच्या गप्पा सुरु झाल्या. त्याला राहिलेल्या कार्ड्स ची आठवण केली आणि उद्या एक तास आधी ऊठ आणि पूर्ण कर असं सुचवलं. एरव्ही साडेसातच्या ठोक्यालाही टंगळ करणारा ओमी, आज मात्र साडेसहाला हाक मारली तस्सा उठला आणि तयार होऊन कार्ड्स पूर्ण करायला बसला. वर्गातल्या शिक्षकांसाठी खास messages लिहिले, lion king drama साठी तो किती proud feel करतो आणि सगळ्यां टीचर्सना तो कधीच विसरणार नाही अशी हमीही त्यात त्याने दिली. एक नेता म्हणून बरेच गुण उपजतच मुलांमध्ये असतात, त्यांना फक्त खुलवायचं काम आपण करायचं. शेवटी मोठ्ठा बॉक्स घेऊन सकाळी मायलेकाची स्वारी शाळेत थोडी उशिराच पोहचली. तसही ओमीला काहीच फरक पडत नव्हता, ह्या वर्षी ६-७ tardy त्याच्या प्रगती पुस्तकात होत्या आणि ह्याचं त्याला आणि त्याच्या पालकांनाही फार दुःख नव्हतं, त्यामुळे आज उशीर झाला काय किंवा नाही काय ह्याच त्याच्या वर्गशिक्षकांनाही फार काही वाटणारच नव्हतं! त्यातून गिफ्ट्स डिस्ट्रिब्युशन program दरवाजातून सुरु झाला होता. सगळ्या शिक्षकांना गिफ्ट्स पाहून खूपच आनंद झाला आणि अशी लोभस मुलं आता अचानक मोठी होणार ह्या संमिश्र भावनांमध्ये त्यांनी ओमीला कडाडून मिठी मारण्याचा कार्यक्रमच सुरु केला... 
शेवटी एकदाचे वर्गात पोहचलो. ज्यांना भेटता नाही येणार असे Mr. Ken, Mr. Erik , Mr. Dimitry (music-teacher) ह्यांची गिफ्ट्स वर्गशिक्षकांनी(Ms. Kapur आणि Ms. Jhawar) ठेवून घेतली, ती त्यांना शाळेच्या नवीन वर्षात मिळतील अशी खात्रीही त्यांनी ओमीला दिली. Mr. Fixer आणि Librarian साठीची गिफ्ट्स पाहून दोन्ही वर्गशिक्षिकाही कौतुकाने पाहू लागल्या. 
शेवटी सगळ्यांचा निरोप घेऊन निघताना का काय माहीत; पण आता माझी कॉलर मात्र नक्कीच ताठ झाली होती आणि शाळेतून निघताना time machine मध्ये बसून प्रवास केल्याचा जबरदस्त feel आला होता!        

Wednesday, May 8, 2024

एक असाही वाढदिवस!

नाही म्हटलं तरी प्रत्येकाला स्वतःच्या वाढदिवशी छानच वाटतं. बऱ्याचदा आपल्या जवळच्या माणसांनी आपल्यावर प्रत्येक वाढदिवसाला इतका प्रेमाचा वर्षाव केलेला असतो की वर्षातले ३६४ दिवसांचं आणि वाढदिवसाच पारडं कधीच समानतेला येत नाही. वाढदिवसाच पारडं नेहमीच जड आणि प्रेमाच्या ओलाव्याने अधिकच भरून जात. त्यात तुमचा एखादा माईलस्टोन वाढदिवस असेल तर केवढी गंमत. ती शब्दात नाहीच पकडता येणार.  

बऱ्याचदा बेचव वाटणाऱ्या काळातलाही वाढदिवस मात्र आपल्याला छानच वाटतो. आता थोडं मग वळून पाहताना मला स्वतःचीच खूप गंमत वाटते. कित्येक वेगळ्या वळणांवरून जाताना परमेश्वराने किती सोयी करून ठेवल्या होत्या ह्याची शाश्वती वाटते. ह्या शाश्वतीची जाणीव ह्या वाढदिवशी जरा जास्तच घट्ट झाली. 

माझ्या जोडीदाराने आपल्या लाडोबाईसाठी केवढी ती तयारी करावी? अगदी दोन महिन्यापासून त्याचा आमच्या सगळ्या गॅंग सोबत मोठाच प्लॅन चालला होता. माझ्या बहिणीची अगदी मध्यरात्री surprise visit आणि झोपलेल्या प्राण्यावर जसे छोटेसे पिल्लू पडावे तशी सॅमी (माझ्या बहिणीची मुलगी ) माझ्या अंगावर टाकून सगळ्यांनी मला मस्त जागे केले. 

आतापर्यंत सुदैवाने माझे प्रत्येक वाढदिवस वेगळ्या धाटणीतले, अतिशय सुखद अनुभवांना साक्षी झालेले. शाळेत वाढदिवस साजरा करता येत नाही ह्याची खंत माझा बाबा पुरेपूर भरून काढायचा. अगदी कौतुकाचा आणि कपड्यावरून हट्ट केलेला पाचवा मोठा वाढदिवस जो माझ्या सगळ्या कुटुंबियांच्या आणि खास करून माझ्या मोठ्या आत्याच्या आठवणीतून कधीही पुसणार नाही. (आता आठवलं तरीही मला त्याची लाज वाटते. न आवडणाऱ्या कुठल्याच गोष्टींना मी कसा हात लावू? ह्यावरून जे काही झालं होत, त्याचे फोटो आता पाहताना मात्र संमिश्र भावना निर्माण होतात.) ज्या वर्षी आई आजारी होती, तो आठवा वाढदिवसही माझ्या बाबाने तितक्याच आनंदात केलेला आणि त्यातनंतरचा नववा वाढदिवस माझ्या दोन्ही आत्या आवर्जून घरी आलेल्या.  आजोळी झालेला अकरावा वाढदिवस. मला वाटत माझ्यापेक्षा माझी सगळी भावंडं आणि अख्खी  कणकवली हा वाढदिवस कधीही विसरणार नाहीत.  cake गावात नसताही बाबाने एका बेकरी वाल्याला जास्त पैसे देऊन उपलब्ध केला होता. माझ्या मावशीने मला किती समजवण्याचा प्रयत्न केला होता, इतका की वाढदिवस  जवळपास पन्नासहून अधिक घरातल्याच नातेवाईकांसोबत झाल्यावर माझी मावशी मला जवळ घेऊन ओल्या डोळ्यांनी केक साठीचा हट्ट कसा चुकीचा होता हे समाजवत होती. माझ्या आजोळी तर माझा बाबा नेहमीच कौतुकाचा विषय होता. एक नवरा म्हणूनही ती एक असामी व्यक्ती त्यांनी अनुभवलेली आणि एक बाबा म्हणूनही. माझ्या मावश्या मला नेहमी म्हणायच्या लग्न झाल्यावर हीच एवढं कौतुक झालं नाही तर हीच कस होणार? पण सुदैवाने हा प्रश्नच उद्भवला नाही आणि माझ्या मावश्या मात्र नेहमीच खुश राहिल्या. अगदी दुसऱ्या वर्षीपासून आठवणारे सगळे वाढदिवस माझ्या ह्या वाढदिवसादिवशी पुनःश्च समोर आले. बाबा गेल्यानंतर मित्र-मैत्रिणींसोबत आणि बहीण भावंडांनी दिमाखात साजरे केलेले. लग्नाआधीचा  special वाढदिवस अमितकडे झालेला आणि लग्नानंतरचा पहिला वाढदिवस पू-सनी ची अशीच surprise visit आणि पूर्ण आठवड्याची आमचा surprise ट्रॅव्हल. 

अठराव्या वाढदिवसांनंतर मी खर तर किमान पक्षी तीन केक तर जास्तीत जास्त ७-८ केक सहजचं कापले असतील. वेगवेगळ्या ग्रुप्स सोबत नवीन नवीन धमाल आणि खूप पार्ट्या. माझ्या रूममेट्स तर मला म्हणायच्या मे महिन्याचा पहिला आठवडा बेकारीचा धंदा जोरात असतो. पण ह्यावर्षी पहिल्यांदा मी माझ्या वाढदिवशी घरी केक असूनही कापला नाही. कारणही तसच. आदल्या दिवशी सायंकाळी अचानक एका इंटरनॅशनल कॉन्फरेन्स वरून मस्त viral fever घेऊन घरी थंडी तापाने बसले होते. माझ्या बहिणीचा आणि नवऱ्याचा अतिशय हिरमोड झालेला. सायंकाळी जेमतेम तयार करून त्यांनी आणि मुलांनी औक्षण केले. अर्थात सकाळ पासून फोनवर वर्षाव चालूच होता. नवऱ्याने केलेले सगळे प्लॅन्स शिफ्ट व्हायची वेळ. झोपण्यापूर्वी मला खुश करावं म्हणून दोन महिन्यापासून कठोर मेहनीतीने त्याने माझ्या सगळ्यात जवळच्या मित्र-मैत्रिणी ते जवळचे नातेवाईक ह्यांना सगळ्यांना जमवून त्याने छान स्लॅम बुक तयार केली होती, त्यात त्याला कधीच माहित नसलेली गुपित होती तर काही प्रसंग आणि क्षणांना मला स्वतःलाच नव्याने उजाळा मिळाला आणि वाटलं हे तर सगळं अगदी काळ-परवाच घडलं होत. कधी एवढी मोठी वळण आपण लीलया पार पाडली? अमितने तर एक मस्त विनोदी कविता तयार केली होती, तर माझ्या जवळच्या मैत्रिणींनी खूपच गुपित सांगितली होती. इतकी की हे पूर्ण वर्षभर माझ्या नवऱ्याला आणि माझ्या इकडच्या मित्र मैत्रिणींना फुकटचा खुराक मिळाला. माझ्या मावश्यांनी  मला मात्र पहिल्यांदा आयुष्यात रडवले, असं कौतुक करून ठेवलं होतं की माझा स्वतःवरच विश्वास बसेना.  ज्या माझ्यावर सदैव सूचनांचा आणि कटाक्ष नजरेने मला पाहण्याचा  जन्मसिद्ध हक्क समजतात. मग मात्र उगाच वाटलं, इतकी वर्ष मी त्यांचा  traditional thinker's च्या bucket मध्ये उगाच समावेश करत राहिले. पण स्वतः आई आणि आणि मावशी झाल्यावर माझही तर तसच काहीस झालं होत खरं. ताई , दादा अगदी माझ्या लहान बहिण-भावंडानी तर  मला अक्षरशः मूर्तिमंत देव केलं होत आणि मला मात्र त्या अखंड रात्री झोप लागली नव्हती. एकतर आधीच खोलीत आजारपणामुळे एकटी झोपले होते, त्यात हा एवढा मोठा फ्लॅशबॅक चित्रपट आणि कित्येक जणांच्या माझ्या पुढल्या वाटचालीबद्दलसाठीच्या अनंत शुभेच्छा आणि थोड्याश्या अपेक्षाही. मावशीचे सकाळचे फोने वरचे बोल राहून राहून आठवत होते, प्रत्येक टप्प्यावर तू चांगली वळणे आवर्जून घेतलीस, आता तर खऱ्या अर्थाने आयुष्य चालू होतय, तेव्हा ज्या कामाचा विडा तू उचलला आहेस ते काम पूर्ण कर. तुझा प्लॅटफॉर्म छान बनव आणि तुझ्यासारख्या अनंत प्रणाली तयार कर. अचानक पुन्हा एकदा दहावीच्या परीक्षेसारखं वाटल, आता ह्या वेळेला तर आपला पेपर अर्धवट नाही ना राहणार? मग पुन्हा एकदा शीतल आणि राजश्रीचा मेसेज आठवला, शांतपणे काम कर उगाच धावू नकोस. आयुष्य मॅरेथॉन आहे आणि स्प्रिंट नाही ह्याची पुन्हा पुन्हा आठवण करत राहिले आणि मग एकदाची शांत झोपले. 

ह्यानंतर खरी गम्मत सुरु झाली. माझ्या नवऱ्याने दुसऱ्या दिवशी साठीचे काही वेगळेच प्लॅन्स आखले होते. पण आजारपणामुळे पुढले दोन दिवस मी घरातून बाहेरही निघू शकले नाही. शेवटी रविवारी सगळे चिडले आणि म्हणाले आज तर खास तुझ्या आवडीच्या हाल्फ-मून बे च्या रेस्टॉरंटला जायचंच आहे. त्यातून माझ्या एका जवळच्या मैत्रिणीने धराने  पू-सनी ला घरी भेटायला बोलावले आणि आदल्याच दिवशी आम्हा सगळ्यांची मूलं taekwondo championship मध्ये मेडल्स घरी घेऊन आली म्हणून थोडं त्यांचं कौतुक करायचा असा अंदाजही तिने दिला. तिथून आम्ही थेट आमचं रेस्टॉरंट गाठणार असा प्लॅन. तसा माझा नवरा मला थाप मारण्यात अजिबात पटाईत  नाही. पण पू-सनी असतील तर त्याला काय पूर्ण जगाला मला टोपी लावता येईल. झाले तसेच, पू ने मस्तपैकी मला पटवले, ताई उगाच तिथे timepass करत बसू नकोस वगैरे वगैरे नेहमीच्या सूचनाही दिल्या. त्यामुळे मला खात्री झाली आपण तिथून लगेचच निघायचे, इतके कि थंड समुद्रजवळच्या रेस्टॉरंट मध्ये बसायचे तर ओढायची शाल पण मी जवळ घेतली. ओमी सॅमी उगाचच खायला देणार नाहीत म्हणून तिने धरा कडे मुलांचे वेगळे खाणेही ऑर्डर केले. इतक्या सगळ्या सावरा-सावरीत आणि आजारपणामुळे खरंच दमून गेल्याने मी माझा वाढदिवस जस्ट चालूच आहे हे पूर्णपणे विसरून गेले. (माझ्या रूममेट्स हे चांगलंच ओळखतील. त्यांच्या मते प्रणालीचा Birthday नसतो तर birth-week असतो.) इनफॅक्ट आमचे three musketeers, एकत्र जमणार म्हणून तीन दिवस न कापलेला केक मी स्वतःच घेऊन तिथे गेले. निघताना नेहमी सारखा मला उशीर होणार आणि ओमीला त्याच्या मित्रांसोबत कमी वेळ मिळणार म्हणून, अमेय सनी आणि ओमी आधीच निघालेले. सवयीपणे Venkyचा  गालीलाभ देण्यासाठीचा फोन आणि माझी गाडी चालू करतानाची तारांबळ एकच वेळ!  ह्या दोन्ही गोष्टींना खरंतर नेहमीच कसा एकत्र मुहूर्त लाभतो ह्याचे कोडे मात्र अजून सुटायचे आहे. पण मला जरब देणारी आणि मला मनसोक्त ओरडणारी Venky ही एक अजब व्यक्ती आहे. मैथिली आणि बाकी सगळेच Venkyला जरा माझ्याबाबतीत दमाने घ्यायला सांगतात. पण खर तर  आम्हा दोघांना त्याच काहीच वाटत नाही. मला तर आयुष्यात हक्काच्या काही स्थानांमध्ये ही एक जागा आहे, ज्याच्याकडे मी अखंड गॉसिप, अतिशय महत्वाचे निर्णय घेण्यासाठीचे opinions आणि कुठल्याही situations मनमोकळ्या पणाने मांडू शकते. तर असो, नेहमी प्रमाणे गाडी चालू झाल्यावर आमचा सवांद(?) सुरु झाला आणि पहिलाच सिग्नल मी ब्रेक केल्यावर पू ची घालमेल. किमान आज तरी हिला तिकीट लागायला नको. तसही माझ्या एका वाढदिवसाला मला असं driving तिकीट लागलं होत, तेव्हा त्याची मेल आली होती, आणि ऐन सेलेब्रेशनच्या वेळेस आम्ही सगळ्यांनी मी कसा आरामात सिग्नल ब्रेक केला होता ह्याची विडिओ क्लिप अतिशय मजेने पहिली होती. चंचल माझी मैत्रीण हे कधीही विसरणार नाही. ती अजूनही म्हणते, "प्रणालिको हर बार नयाही  birthday surprise मिलता है। हम तो सोच ही नही सकते और एन्जॉय भी नही कर सकते।" पण त्या वर्षांनंतर खर तर मी पहिल्यांदांच असा सिग्नल ब्रेक केला असेल. तर असो, ह्या सगळ्याचा परिणाम योग्यच होत होता, आणि जेव्हा धराकडे पोहचले तेव्हा Venky- मैथिली सुद्धा बाहेर होते. धरा-जिगी मुलांसाठी treasure-hunt प्लॅन करत होते, त्या दोघांनीही अमेय सनीचा काहीच अंदाज नसल्याचा भाव आणला. Venky ने हमखास मलाच का बाहेर ठेवलं आणि अमेयला प्लॅन मध्ये घेतलं वगैरे वगैरे कटकट चालू केली. त्या सगळ्या गडबडीत आम्ही बॅकयार्ड ने आत गेलो, तर खरंच surprise! आमचे दोन्ही मामा-मामी , माझी नणंद श्रेया, मुंबईहून खास आलेले नातेवाईक आणि आरव, सगळेच! रामा! "अजि म्या स्वर्ग पहिलाच!" एखाद्या लहान मुलाला व्हावा तसा गगनात मावेना असा आनंद मला अनुभवता आला. इतके महिने हा प्लॅन successful व्हावा म्हणून एक अख्खी टीम कामाला लागली होती, त्यांनाही तितकाच आनंद झाला. ह्या सगळ्याचा हिरो अमेय आणि जो प्लॅन succeessful व्हावा म्हणून serious tone मध्ये तोंडावर खोटं बोलू शकतो तो त्याचा साथीदार सनी आणि माझा गोंडा पिल्ला ओमी मात्र त्या क्षणी उपस्थित नव्हते. जेवण घेऊन यायला म्हणून गेलेले, तर त्यांना रेस्टॉरंट वाल्यानीच त्यांना थांबवून ठेवलं होत. पण आयुष्यातले सगळे खास क्षण आखीव रेखीव नसतातच मुळी. त्यातलाच हा ही एक!  

त्यानंतर मला वाटल बाबाकडून राहिलेला अठरावा वाढदिवस आज साजरा झाला. मैथिली-धरा आणि दोन्ही मामींनी मिळून अतिशय सुंदर decoration केले होते. tiera आणि sache पण आणले होते. मला आवडणारी खास पाणी पुरीही धरा ने केली होती. व्हाईट-पिंक एकदम girly girly cake, सोबत आनंदी, निरपेक्ष मायेचे चेहरे आणि निरागस मुलांची रेलचेल, तत्क्षणी वाटलं जगातल्या श्रीमंत माणसामध्ये माझाही समावेश आहे!

ता.क. - हा ब्लॉग लिहायचा उद्देश, माझ्या thanku रुपी भावना तुम्हा सगळ्यांपर्यंत पोहचवण्यासाठीचा आहे. अजूनही माझा आवाज, आणि तब्येत पूर्णपणे बरी नसल्याने, ह्या वेळी खूप जणांनी फोन केले तरी वेळेत ना उचलता आल्याने दिलगिरीही आहेच. पण जसं  माझ्या रूममेट्स म्हणतात, माझा birthday कधीही नसतो birthday-week  आणि birthday -month आहेच ना! तेव्हा थोडी ताकद आल्यावर बोलूच आणि नवे प्लॅन्स ठरवूच. 


Monday, February 19, 2024

स्वर्गातला प्रवास!


रोजच्या आयुष्यातल्या प्रवासाचा वेग वाढवता वाढवता कधीतरी वाटत आता लाल दिवा लागावा आणि थोडं थांबावं, तशीच माझी शुक्रवारची सकाळ! उठले तोच हलकासा ताप आणि सर्दीचा जोर वाढलेला. आवडीची महत्वाची काम करत असली तरी आजचा दिवस आरामात घालवायचा असा मानाने आणि शरीराने दोघांनीही कौल दिलेला. अमेयने सक्त ताकीद देऊन 'आज लॅपटॉप जवळ फिरकलीस तर बघ' ह्या भूमिकेने सकाळी फुकटचा ब्रेकफास्ट दिलेला! गादीवर पडून राहावा हा माझा स्वभाव नसल्याने, काहीतरी उद्योग करावा म्हणून थोडी वहीवर रंगरंगोटी केली, जमतील तेवढे कामाचे नवीन विचार रेखाटले आणि वाचत असलेल्या दोन पुस्तकांपैकी एकाची गाडी सुरळीत नेऊ ह्या विचारांच्या छापा काटा खेळत बसले. खूपदा आखीव रेखीव प्रवास आवडणारे आणि करणारे बहुतांशी आपण, अशा एखाद्या फुटकळ प्रसंगी पण नको ते पूर्ण करण्याच्या छंदात अडकतो आणि हरवून जातो. 

पुन्हा एकदा विचार केला, नेमकं होतंय काय त्याचा थोडा शहानिशा लावू. म्हणून विचार केला, दोन्ही पुस्तकांपैकी एकाला हात न लावण्याचे कारण शोधूया मग  उरलेल्या रिकाम्या वेळेत कामकरी मुंगीला एखदा तरी उद्योग मिळेल. एक पुस्तक बायोग्राफी सदरात मोडणारं, एका  बलाढ्य श्रीमंताची आणि जगात वेगळी स्वप्ने सत्यात उतरवण्याऱ्याची ज्यात ताकद आहे तरीही त्यातले काही अनुभव साशंक असावेत अशी मनाला असलेली शंका तर दुसरे पुस्तक सेल्फ हेल्प प्रकारातले, ज्यात नाही म्हटलं तरी बऱ्याचदा थोडासा स्वतः मध्ये कमीपणा जाणवू लागेल असं आपसूकच वाटावं. मग जरा विचार केला आज काय झालं किंवा केलं तर झक्कास वाटेल? रोजच्या कामांनी स्वतःहूनच निषेध दाखवलाय आणि आजारी झाल्यावर आश्चर्य वाटावं असं घर सुरळीत चालताना पाहून मनालाही वाटावं "आज का दिन जिले अपना।" बस इतकाच इशारा खूप होता. एखदा स्वैरानुभ वाचावा किंवा लिहावा एवढंच वाटत होत तर! पुस्तकांच्या न वाचलेल्या खणात डोकावलं आणि "काश्मिरीयत" बाहेर काढलं. 

इतके दिवस हे पुस्तक वाचायला हातच लावला नव्हता ह्याची दोन कारणे - १. मी लेखिकेला आठवड्यातून आवर्जून भेटतेय त्यामुळे ह्या पुस्तकात नेमक्या त्रुटी कशा झाल्यापासून ते बरयाच अनुभवांची थोडीशी ओळख असल्याने वाटावं हे माहितेय २. आपल्याला आपला सगळा वेळ प्रोडूक्टिव्हिटी प्रकारात मोडावा असा वाटणाऱ्यातील मी, बऱ्याच वेळा नको ते कूटप्रश्न सोडवण्याच्या मार्गावर राहणार ह्या मनस्थितीत हे पुस्तक वाचणं म्हणजे पुस्तकाचा अपमान. शेवटी हवा तसा मानाने हिंदोळा दिला आणि हे पुस्तक माझ्या वाचायच्या खुर्चीपासून ते झोपायच्या गादीपर्यंत सगळीकडे आलं. 

पुस्तकाबाबत लिहिण्यापेक्षा हे पुस्तक माझ्याकडे कस आलं ह्याचाही प्रवासही सुंदर आहे. तो मी इथे थोडक्यात नमूद केलाय give it a read! असो, तर असा प्रवास करून आलेलं पुस्तक तशाच मनस्थितीत मी ते वाचावं अस माझ मलाच प्रांजळ वचन होत आणि आज ती योग्य वेळ साधली होती. 

ह्या पुस्तकाबद्दल लिहयाचा माझा अधिकार नाही, पण एक उत्तम वाचक म्हणून माझ्या मनाला भावलं, समजलं आणि ज्या अनुभूतीच्या शोधात लेखिकेने स्वप्नातही पाहता येणार नाही असा प्रवास मनोधैर्याच्या बळावर सहज पार केला त्यातुन जे उमजलं ते लिहिण्याचा थोडासा प्रयत्न मी करतेय. ह्यातून, हे पुस्तक प्रत्येक वाचकाने वाचावं आणि स्वतःचा प्रवास सुरु करावा असा माझं ठाम मत आहे!

संसारात स्वतःच्या मर्जीने रमलेली एक मध्यमवयीन महिला. जिचा संसार उत्तम रित्या पार पडताना, आयुष्यात पाहिलेल्या असंख्य घटनेंनी, ती बेचैन झाली, जगण्याच्या ठरवलेल्या चौकटीबाबत अगदी मूलभूत प्रश्न निर्माण झाले आणि त्यातूनच मग तिने जगाला पटणार नाहीत असे प्रयोग स्वतःच्या घरात सुरु केले. स्वतःच्या  हुशार मुलींना शाळेतून काढले आणि होमस्कूल ची वाट दाखवली, ती त्यांना कोणी मोठं होण्याकरता नव्हे तर आयुष्य आनंदात जगण्याची सवय व्हावी म्हणून. शिकताना एक उत्तम विद्यार्थी बनता यावे म्हणून. एक ना अनेक तिने चाललेले मार्गच मुळी अस्तित्वात नसल्याने, एखाद्याला तो सगळाचं प्रवास वेगळा वाटावा आणि सोबतच अद्भुत! मुलींना खर खोटं जग समजावं  आणि जगातल्या बऱ्यचशा घडामोडी चर्चेपुरत्या मर्यादित न ठेवता त्या पडताळण्यासाठी प्रत्यक्ष तपास करावा ह्या भुकेपोटी झालेली तिची आणि तिच्या कुटुंबीयांची काश्मीर वारी! ह्या वारीत अनाकलनीय अशा अनुभवांची साक्षी  होताना तिचे संवेदनशील मन पुन्हा एकदा हेलखावते आणि त्यानंतर तिचा पुन्हा एकदा काश्मीर प्रवास घडतो. पण हा दुसरा प्रवास म्हणजे सोलो-ट्रिप. अगदी तिचा प्रियकर नवराही ह्या प्रवासात तिच्या सोबतीला नाही. काश्मीर ती फिरण्यासाठी नव्हे तर वेगळ्याच अनुभवासाठी जाते तोच हा प्रवास! त्या अनुभवाविषयी लेखिकेलाही सुतराम कल्पनाही नाही किंवा त्याची तिला प्रवासा पूर्वीपासून आसक्तीही नाही. ह्या प्रवासाने तिला उद्या जगातल्या अलौखिक यादीत समाविष्ट व्हावे असा प्रवासापूर्वी आणि नंतरही  उद्देशही नाही. तिला फक्त एक स्वैर अनुभव घायचाय आणि सोबत तिला पडलेल्या कोड्यांची उत्तरे. एवढ्या निश्चल ध्येयाने ती तो प्रवास सुरु करते. 

प्रवासाची गोष्ट तुम्ही पुस्तकात वाचलाच. पण हे पुस्तक का वाचावं हे ऐकायचं असेल तर ऐका! 

कैक वर्ष जे बालमन आपण जगाच्या चौकटीतून बांधून ठेवतो आणि हळूहळू जे चैतन्य आपण गमावून बसतो, ते चैतन्य आणि तेच निर्गुणी बालपण तिला आणि वाचकाला ह्या प्रवासात सापडतं. सीमेचा पाठपुरावा करायला गेलेल्या एका सध्या स्त्रीला सुख, दुःख, मान, अपमान, धक्कादायक, आश्चर्यकारक, मायेचे आणि त्याहून पलीकडे म्हणजे अद्भुद अनुभूतीचे अनुभव ह्यात येतात, ते सगळे क्षण वाचकाला स्वतःच जगल्याचे वाटतात. त्यातून आयुष्यातल्या पुढच्या प्रवासासाठी ती अजून ताजीतवानी होतेच पण त्याहूनही जास्त म्हणजे आयुष्य पाहण्याची नवी दिशा तिला मिळते. माणसाच्या मनांनी ठरवलेल्या फुटकळ सीमेरेखेची कीव येते आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे स्वतःच गुपित उलगडण्याची पुन्हा एकदा मन झेप घेते आणि स्वचा प्रवास एक वाचक म्हणून सुरु होतो, ह्यात ह्या पुस्तकाचं श्रेय सामावलं आहे!

 हे पुस्तक अतिशय सुंदर आणि ओघवत्या भाषेत लिहिलं आहे. त्यात उगीच कसलेही संदर्भ वाढवले नाहीत की कमीही केले नाहीत. कदाचित थोडे अदभूत आणि कटू अनुभव शब्दांमुळे थोडे बोथट झाले असाच मला वाटतं. सगळेच काही शब्दात पकडता आले असते तर माणसाने विध्यात्याच्या चमत्काराला चमत्कार म्हटले नसते! ह्यातला एकनेक अनुभव खरा आहे. हे जरी लेखिकेने लिहिलं असल तरी एक वाचक म्हणून आणि लेखिकेची परिचित म्हणून मीही तेच सांगेन. ह्याचं कारण म्हणजे, हे पुस्तक प्रवासानंतर तब्बल साडे आठ वर्षांनी प्रकाशित झाले. त्या दरम्यान लेखिकेचा जो खरा प्रवास झाला, त्यात ती पुरती बदलून गेली. मुळातच हे पुस्तक का लिहावं ह्यापेक्षा नेमक्या कुठल्या प्रेरणेने लिहावं ह्यासाठीचा तिचा तिच्याच मनाशी चाललेला अखंड संवाद आणि अगम्य शोध ह्यामुळे जे साधता आलं त्यासाठी एक वाचक म्हणून आपण खरंच  भाग्यशाली आहोत. जगन्नाथ कुंटेच नर्मदे हर हर हे पुस्तक जर तुम्ही वाचल असेल तर थोडंफार मी काय म्हणतेय ह्याचा अंदाज तुम्हाला येईल. 

मी हे पुस्तक अवघ्या अडीच दिवसात वाचून संपवले आणि लागलीच माझी प्रतिक्रिया पण लिहिली, इतका सहजपणा आणि ओढ त्यात आहे. हे पुस्तक वाचून झाल्यावर मात्र एकाच वेळी खूप फ्रेश, अचानक आपणही असा लाभदायी प्रवास करावा, नकाश्यावर न सापडणारी गाव पाहावीत, तिथे आपलीच हक्काची जन्मोजन्मीची हरवलेली नाती पुन्हा एकदा आपल्याला भेटावीत आणि पुनहः एकदा हवं तस रस्त्यावरून नाचत गात, डोंगर माथ्यावर उडया मारत हिंडण्याचा अनुभव मिळावा म्हणून थोडीशी लालसाही उद्भवते. कोंडून ठेवलेलं बालमन उगाच डोकावत राहत आणि हट्ट करत राहतं  - "तुझेभी ये हक्क है! फिर से अजमाले खुदको। में तो तेरे साथ ही हूं।" जर असा हट्ट तुम्हाला करायचा असेल तर ज्याने तुमचा जन्म देऊन कर्म दिले त्यावर एक निखळ विश्वास आणि निरंतर श्रद्धा मात्र हवी ह्याचा दृढ निश्चय हे पुस्तक वेळोवेळी देत राहत. 

छोटेसे मनोगत - पुस्तक वाचताना ते किती वेळात पूर्ण करायचं असलं काहीच माझ्या मनात नव्हतं. फक्त एवढंच वाटत होत, खूप दिवस झपाटल्यासारखं काही आपल्या आयुष्यात होत नाही, तर एखाद्या वेगळ्या रानवेडीची कथा वाचून तर पाहू. कित्येकदा दुसऱ्याचा प्रवासही आपल्याला बरच काही शिकवून जातो. खूपदा आपण वरच्या रंगला भुलणारे, बऱ्याचदा पुस्तकाच्या जाडीनुसार त्यातले सार ठरवून मोकळे होतो. पण जशी वाऱ्याची एखादी झुळूक आपल्याला ताजीतवानी करू शकते, पाण्याचा एक घोट आपली तृषा शांत करतो तशीच काही पानांची पुस्तकही आयुष्यात साधक परिणाम साधू शकतात. मागच्या दीड महिन्यात नावाजलेली, अमेरिकेत आणि जगात अतिशय गाजलेली अशी पुस्तक मी ज्या वेगाने संपवू शकले नाही, त्यात मागच्या अडीच दिवसातल्या काही तासांतच 'काश्मिरीयत' नावाचे नवे पुस्तक अथ: पासून इति पर्यंत संपवले. त्यानंतर खूपदा विचार केला, आयुष्यातही आपल्याला नेमक्या ह्याच कस्तुरीचा शोध घ्यायचा असतो, ज्यासाठी आपण नुसते वेड्यासारखे धावत राहतो. परिणामाअंती विचार केला तर वाटत जे हवं होत ते सापडलच नाही पण काही गोष्टी अचानक दैवी अनुभवासारख्या पदरात पडल्या. सगळीकडे नंबर्स आणि चढाओढीच्या झेंड्यांनी आयुष्यातला साधा सरळपणा पुसला आणि त्यासोबत शाश्वत उदासीनता मात्र आपण आपल्यासोबतची अखंड सोबती केला. जिथे तिथे स्वतःचे ठसे उमटवताना त्यातले सगळेच 'कालाय तस्मै नमः' असतात हा शाश्वतपणा विसरलो आणि वेड्यासारखे आपण नको ते शोधत बसलो. ह्या पुस्तकाने मला इतका फ्रेश केलं की, पुढच्या टप्प्यावरचा प्रवास करताना मी नेमक्या कुठल्या ऊर्जास्रोतांकडे पाहू ह्याहीपेक्षा कस पाहू हे शिकले. अचानक वाटलं सोपच तर आहे सगळं, फक्त आता जे जमेल तेवढे करूया, आजचा प्रश्न सोडवायची ताकद कमवूया. बाकी अनंत प्रश्न जे उद्भवतील ना उद्भवतील ह्याचीच शंका असताना उगाच आपल्या डोक्यावर बोजा वाहायचा तरी का? नको त्या यशाच्या सीमारेघा रेखाटीत बसण्याची आपली पात्रता नसताना त्या गोष्टीची चेष्टा तरी का करावी? सुप्रिया ताईचे काश्मीर मधले पहिले आणि निघतानाचे शेवटचे पाऊल आपल्याला आयुष्यातले एवढे मोलाचे सार नक्कीच शिकवून जाते आणि अचानक मनात गाण्यांचे सूर कानी पडतात - "दिल ढूँढता है, फिर वही, फ़ुर्सत के रात दिन... "      


ह्या लेखिकेचा कणभर प्रवास मी माझ्या पॉडकास्ट वर रेकॉर्ड केलाय. पण जो प्रवास मी रेकॉर्ड करूच शकत नाही तो प्रवास मला अंशभर सुप्रिया ताई सोबत आयुष्याची शिकवण म्हणून मिळावा, हे मी माझे अहोभाग्य नक्कीच समजते!   

Sunday, February 18, 2024

पसाऱ्यातून नियोजिताकडे!

शनिवारची पावसाळी दुपार. सर्दी आणि खोकल्याचा जोर पावसाबरोबर स्पर्धा करणारा. पण रात्री झोपून दुपारी जेवायच्याच वेळेत उठल्याने झोपही येऊ नये अशी अवस्था. त्यातच ओमीला आदल्या रात्री दिलेले वचन, उद्या आपण नक्की एकत्र खेळू. दुपारच्या चिकन मेजवानी नंतर मी आणि ओमी एकदम फ्रेश झालो. सर्दीचा जोरही थोडा आवरत होता. मी एकदम नवा खेळ तयार करण्याच्या उत्सहात, त्यातच चिरंजीवांनी आईचा बेत ओळखला. 

परत ही बाई नको त्या गोष्टी तयार करून, उगाच  निंबध लिहून घेण्यापेक्षा  किंवा आपल्याकडून क्रीटीव्हिटीच्या नावाखाली वाट्टेल ते स्वतःचे खरे करण्यापेक्षा, आपणच तिला सुचवू काय खेळायचे ते. तसाच तो माझ्याजवळ आला आणि म्हणाला आज आपण लेगो खेळूया. ह्या विषयात मला रस नाही असे नाही, पण ज्या तऱ्हेने ओमी लेगो जोडतो ते माझ्या कल्पनाशक्तीच्या पलीकडले आहे. लेगो मॅन्युअल बाजूला ठेवून, त्यातले भावतील असे पिसेस उचलून त्याच्या डोक्यातल्या प्रतिमा तो साकारतो. समोरच्याने ह्यात नेमकी कशी साथ द्यावी ह्याला मी खरंच अनभिज्ञ आहे.  त्यातूनच त्याचे सगळे किड्स शो मी पहातेच असं नसल्याने, बऱ्याचदा वेगवेगळ्या रंगीत लेगो पीसची जी जुळवा जुळव करतो, तो माझ्यासाठीच नवीन उपक्रम असतो. ह्यात थोडंफार त्याच्या बाबाला कळत तरी आणि ह्या खेळात त्याला सोबत कशी करायची ह्याच त्याला तोंडफार कसब आहे.  दुपारी बाबा मात्र स्वतःच पहिल्यांदा केलेल्या चिकन वर मनसोक्त ताव मारून छान झोपून पण गेला. त्यामुळे मला रेस्क्यू मिशन दिसेना. 

ओमीला म्हटलं चल शिकते मी तुझा लेगो गेम. सांग काय करायचं ते. तर त्याने दोन बरेच लेगो ठेवलेले मोठे बॉक्स काढले. त्यात एक नवीन लेगो ऑर्गनायझर बॉक्स ज्यात थोडे लेगो बाबाने सॉर्ट करून ठेवले होते, आणि दुसरा बराचसा लेगो पीस चा जंजाळ आ वासून आमच्याकडे पाहत होता. आता काय करायचा हा मी विचार बोलून दाखवण्याआधी त्याने मला त्याचा रुल # १ सांगितला तो असा - "फर्स्ट यू सॉर्ट एव्हरीथिंग अँड कीप इन धिस न्यू ऑरगनायझर बॉक्स." मी ओके म्हटलं आणि नंतरचा रुल? तो म्हणाला हे झाल्यावर मग रिअल गेम मी तुला शिकवतो. एकामागून एक सगळ्या रंगाचे करॅक्टरचे चाकांचे असे सगळे पिसेस सॉर्ट केल्यावर हे साहेब सांगतच राहिले, हे असं नाही तस कर, मधूनच मी एखादा आधी लावलेला कप्पा हलवला आणि तो पुन्हा रे-अरेंज केला तर ह्याची शेरेबाजी! असं नाही आधीचा होता तसाच ठेव वगैरे वगैरे. ओमी चा एक तसा  प्रॉब्लेम आहे. त्याला तुम्ही जर एखादी गोष्ट आधी दाखवली आणि सांगितलं हे असं, तर मग लगेचच त्यातला दुसरा बदल तो पण दुसऱ्या माणसाने सांगितलं तर तो दुसऱ्याला खोट ठरवणार. ह्यात तर त्याच्या बाबाची मेहनत वाया जात होती आणि हा तर त्या दोघांचा विषय. मग तर माझी काय सुटका होणार होती. त्यातूनच त्याला हटकावून, मी माझं काम करत राहिले. 

मध्येच त्याला आईला मदत करावीशी वाटली, तर दोन चार पिसेस देऊन हा कार्टून आपल्याच कामात गुंग. हळू हळू एक बॉक्स रिकामा होत आला, तसाच त्याने कपाटातून दुसरा बॉक्स काढला आणि म्हणाला "काम अभी बाकी है!" तो पर्यंत त्या कामाची गती आणि वेड मला लागलेच होते.  म्हटलं आज काय तो ह्याचा सोक्ष मोक्ष लावूनच टाकते. मागचा अक्खा महिना ह्या लेगो ऑर्गनायझर बॉक्स ने घरात गोंधळ घातला होता. तो ऑर्डर करण्यापासून ते आल्यावर त्याचा उपयोग करेपर्यंत अमेयचा पार मिशन काश्मीर झाला होता. वेळ मिळेल तसा थोडा थोडा करून त्याचा कार्यक्रम चालू होता, पण दोन आठवडे झाले तरी काम  पुरे झाले नव्हते. शेवटी चिरंजीवांनी ह्या कामासाठी लागणार उत्तम गडी हेरला आणि गनिमीकाव्याने तो पकडला पण! दोन बॉक्स झाल्यावर, अमेय उठला तो पर्यंत दोन तास झाले होते. मग उरलेले चिरी-मिरी लेगो त्याच्या वेगळया बॉक्स मधून, काही खालच्या खोलीतून तर काही वेगळ्याच कप्प्यातून प्रवास करून पोहचले. एखादं माकड जर ऊवा काढायला लागलं, तर वेळेस समोरच्या माणसाला मारून, तो त्याच डोकं साफ करेल, पण त्या माणसाला हलू देणार नाही, तसाच माझा काहीसा काम करायला घेल्यावर माझा माकड होतो. मग त्या पसऱ्याचा एकूणच कार्यक्रम संपला आणि पहिल्यांदाच अक्ख्या कुटुंबाला अशा कामातून मिळालेला आनंद ओसंडयाला लागला. जणू काही ढगाळलेले आकाश निरभ्र झाले. अमेयची नको एवढ्या कोडयातून सुटका झाली, ओमीची मिशन सक्सेसफुल आणि माझी? माझ्यासाठी घेतलेलं काम झाले हीच मोठी मिशन, त्यातून पसारा सावरण्याचे हे तर माझं आवडीचं काम. 


त्यानंतर मग, चिरंजीवांचं अक्ख मोठे कपाट ज्यात खूप खेळणी, गेम्स, शाळेच्या भल्यामोठ्या असाइनमेंटची रद्दी, चित्रं काढून जपून ठेवलेली किलोभर अजून रद्दी, सापडतील त्या प्रकारातले रंग, विविध प्रकारचे पेन पेन्सिल, क्राफ्टच्या नावाचा न संपणारा सोमवार बाजार आणि जत्रेत सापडतील अशा अद्भुत असंख्य जमा केलेल्या निरुपयोगी वस्तू अशी ती अलिबाबाची गुहा मी हातात घेतली. त्यातल  एकन-एक पेन, छोटी-छोटी खेळणी स्वतः टेस्ट करून टाकाऊ कि टिकाऊ ठरवून, सगळ्यांचेच वर्गीकरण करून सरते शेवटी ते पण लावून झाले. ह्या सगळ्या कचऱ्याचा निचरा करताना राहून राहून वाटले, ह्या अख्या सामानात एखाद मुलांचं स्टडी हॉस्टेल चालवता येईल. साडेपाच वर्षाच्या मुलाची चैन करण्यात आमच्या मित्र मंडळींनी आणि नातेवाईकांनी कसलीच कमी ठेवली नव्हती. एकूणच पसाऱ्याचा अंदाज द्यायचा असेल तर मोठे लॉंन्ड्री बास्केट भरेल इतक रासायनिक पृथी:करण केलेला नुसता कचरा होता. ह्यात कोणाला आला ना आला मला मात्र जग जिकंलयाचा अनुभव आला, पण आनंद हा नेहमीच क्षणिक असतो. इतका वेळ कामगाराला कामाला लावून, अचानक मोबदला द्यायच्या वेळेस बॉसचा सावकार होतो तसा ओमी म्हणाला, अजून हे छोट कपाट आणि हा बॉक्स बाकी राहिलाय. घ्या... पण शेवटी ह्या कामाची व्याप्ती माझ्या को-वर्कर ला कळली. मग मात्र सगळे बसून मनसोक्त मोनोपोली खेळलो आणि गम्मत म्हणजे सावकार खरंच सावकार झाला, ह्या ना त्या प्रकारे त्याला चान्स कार्ड्सची लॉटरी लागत राहिली, अमेयला बऱ्याचं प्रॉपर्टी मिळाल्या आणि आज मात्र मला नको त्या वेळी नको ते फासे पडून मी मात्र सरते शेवटी ११ मिलियन डॉलरच्या कर्जात डुबले! 

झोपताना झोप तर चांगली लागली, पण सावकार सुद्धा काही न करता तितक्याच आनंदातच झोपला होता, सकाळी माझ्याहीपेक्षा दुप्पट आनंदात उठला आणि ऑर्गनाईज्ड लेगो बॉक्स एका खोलीतून दुसऱ्या खोलीत स्वतःची प्रॉपर्टी असल्यासारखा मिरवू लागला तेव्हा मात्र माझा मला कसला अभिमान वाटला! जगातली सगळ्यात मोठ्ठी अवॉर्ड्सही आईला कशी क्षुल्लक वाटू शकतील, ह्याची ती ओळखीची खूण होती.     



    सकाळी मिळालेली शाबासकीची थाप! 












       



Friday, September 8, 2023

रेडिओ - एक आनंदप्रवास!

एकदा का मायदेश सोडला की प्रत्येक प्रांतीय आपला कुठे ना कुठे पाऊलखुणा शोधायचा प्रयत्न करतोच. त्या नाही मिळाल्या की मग त्या उमटवायचा प्रयत्न! त्यातून मराठी माणूस म्हटलं की, उत्तम साहित्य, संगीत, नाटक आणि त्यासोबतच त्याची खाद्यसंस्कृती आणि सणवार ह्या सगळयाचा शोध तो जगाच्या पाठीवर घेतच राहतो. जमेल तिथे आपलं जग प्रस्थापित करतो आणि खास मराठी संस्कृतीचा ठेवा जतन करतांना नवीन दिशेने प्रवास सुरु करतो. माझंही काहीसं असंच झालं. 
२०११ मध्ये नोकरी निमित्त डॅलस, टेक्सास इथे आले आणि अचानक माझं मराठीपण हरवण्याच्या खुणा मला दिसू लागल्या. सोबत काम करणारे एकतर अमेरिकन, ज्यू, युरोपिअन किंवा भारतातले विविध प्रांतीय पण मराठी क्वचितच कानी येणार वर्ग. नव्या प्रांतात कौमार्य अवस्थेत असल्याने खूपशा मराठी कुटुंबाचाही संबंध तसा तुरळकच होता. मराठी मंडळ संकल्पना ही माझ्यासाठीतरी  त्यावेळी म्हणजे मराठी कुटुंबांशी संलग्न असणारी संस्था आणि कार्यक्रमांनाही सर्व साधारण कुटुंबीयच येत असावेत अशीच होती. अर्थात, येऊन दोनच महिने झाले होते त्यामुळे शहरातील भारतीयांची बरीचशी माहितीच नव्हती. फेसबुक वर अजून शहरातले मराठी कट्टे जमायचे होते आणि मराठी खाणावळही त्या शहरात तेव्हा नसल्याने मराठीची भूक फक्त मी सोबत आणलेल्या मराठी साहित्यावर भागवत होते. ऑफिसला जाता येताना देशी रेडिओ मात्र ऐकायला मिळत होता. तोच रेडिओ मग घराच्या टेबलक्लॉक वर सकाळ-संध्याकाळी ऐकायचा. 
साधारण महिन्यानंतर जाणवलं ह्या रेडिओ वर भारतातल्या विविध भाषा ऐकू येतात पण मराठी भाषा ऐकूच येत नाही. मग त्या रेडिओची वेबसाईट पहिली तर पक्कचं झालं, मराठी कार्यक्रम होतच नव्हते तर! मनात अगदी खट्ट झालं. त्याच आठवड्यात माझ्या मावसभावाशी फोनवर बोलणं झालं तो तर पार विस्कॉन्सिनला राहणारा. तिथे तर भारतीय गंधच मुळात विरळा. त्याने मला सुचवलं तू तर किती छान कार्यक्रम करू शकतेस. बरं म्हणून फोन ठेवला, आणि विचारांचे नवीन सत्र चालू झाले. अचानक कस्तुरी मृगाला कस्तुरी सापडावी तसच काहीसं झालं...  शाळेत असताना थोडेफार बालचित्रवाणी आणि किलबिल कार्यक्रम केले होते आणि शिवाय शाळेत अखंड स्मरणिका कार्य, विविध स्पर्धांसाठी नाटकं लिहिणं, बसवणं, कार्यक्रमांचे सूत्रसंचालन असा बराचसा इतिहास दिसू लागला. उन्हाळी सुट्टीतही आम्ही भावंडं बरेच प्रयोग करायचो आणि त्या कार्यक्रमांचे दिग्दर्शन, लिखाण आणि सूत्रसंचालन करण्यात मला खूपच उत्साह असायचा. झालं मग त्वरित त्या शाळेतल्या आठवणींच्या बळावर आणि भावाच्या शब्दांच्या पाठबळावर पुढचा कसलाही प्रश्न मनात न आणता त्वरितचं  रेडिओ संपर्काला ई-मेल केला, आणि चक्क विचारलं मराठी कार्यक्रम ह्या रेडिओवर का बरं होत नाहीत? दुसऱ्या दिवशी मला त्यांचे उत्तर म्हणजे, थेट भेट घेण्यासाठीच त्यांनी मला बोलावलं. 
रेडिओ CEO म्हणजे साक्षात शबनम मॉडगीळजी माझ्यासमोर. त्यांनी स्मितहास्यात विचारलं , "So you're that girl, who asked us why not Marathi is on this radio? As per Dallas head counts there are 600+ marathi families and Funasia Radio has not yet captured those hearts? You know I grew up in Nagpur during my schooling days, and I absolutely love Marathi but cannot do marathi programs. But I would love to give you weekly hour spot and see what magic you can bring to our Radio. Will you take it?" पहिल्याच काही मिनिटातला हा प्रश्न म्हणजे बाउन्सर होता. पण त्याक्षणी जर मी होकाराला दिरंगाई केली असती तर डॅलस रेडिओ वर पुढली पाच वर्ष मराठी ऐकायला आलं नसत. 
काहीही मोबदला न घेता सातत्याने सुरुवातीचं एक वर्ष गुरुवारी सकाळी १० वाजताना (नोकरीतून ही वेळ मी मॅनेज करत होते) आणि मग पुढली चार वर्ष शनिवारी दुपारी १-२ ह्या अगदी प्राईम वेळेत मी हितगुजचे कार्यक्रम करत राहिले. प्रत्येक कार्यक्रम करताना एकच ध्यास होता, आज ह्या शहरात आलेला कोणीतरी आपली मायबोली आणि संस्कृतीशी नाळ घट्ट करू पाहत असेल, त्याला ह्या शहरातल्या मराठी कार्यक्रमांची माहिती हवी असेल आणि त्यापल्याड नवनवीन मराठी गाणी, नवीन मराठी प्रतिष्ठित साहित्यिक, संगीतकार आणि नवीन मराठी साहित्याशी ओळख करून हवी असेल त्या प्रत्येकाला हा कार्यक्रम आपलासा वाटलला पाहिजे. मग कधी हितगुजमध्ये खास पाहुण्यांशी गप्पा तर कधी नवीन पुस्तकांवरची  टिपणी, कधी नवीन चित्रपटांची माहिती तर कधी जुन्या कधीही न हरवू वाटण्याऱ्या सांगीत आणि साहित्याची हमखास नोंदणी. ह्या उपक्रमात मला डॅलस मधल्या सगळ्या मराठी माणसांना एकत्र आणायचं होत, म्हणून मग शहरातल्या मराठी बंधू-भगिनींना घेऊन छान श्रुतिका तयार केल्या, त्या अमेरिकन मराठी माणसाला आपल्या वाटाव्यात अश्याच असाव्यात ह्याकडे लक्ष दिलं. त्यात कधी शोकांतिका तर कधी मजेदार किस्से, कधी नवनवीन शोध तर कधी अमेरिका पाहायला येणाऱ्या पालकांच्या मनस्थितीचा शोध, अशा विविध रोजच्या आयुष्यातला कथा आणि त्यातून मराठीमनांची मराठी संस्कृती जतन करण्याची धडपड दर्शविण्याचा तो एक आवडीचा उपक्रम ठरू लागला. अगदी इथे जन्मलेल्या मराठी लेकरांचं कौतुकही ह्या कार्यक्रमातल्या "इवलेशी रोपे" ह्या सदरात मी करायचे. ह्या सदरात मला माझ्या बांधवांकडून कधी तर खूपच थक्क करणाऱ्या कामगिरींची माहिती मिळू लागली. खूप जण आवडीने आपल्या पाल्यांची घोडदौड मला सांगू लागली.  अगदी दक्षिण आशियाई सौंदर्य स्पर्धेत जिकंलेली कुमारी ते राज्यस्तरीय अमेरिकेन खेळातला खेळाडू ह्या सगळ्यांना हितगुजमध्ये  हक्काची गप्पांची बैठक मिळे. इथल्याच मुलांशी मैत्री झाल्यावर, मग तर मला इथल्या पिढीला कधी ज्ञानेश्वरीतल्या निवडक ओव्यांचा साध्या भाषेत परिचय ते महाराष्ट्रातील विविध लोककला, भाषेतल्या गमती-जमती, भजनाची गोडी तर कधी आयुष्याच्या सगळया क्षेत्रात ज्यांनी लाखमोलाचा ठेवा निर्माण केला अश्या सगळ्यांशीच त्यांची गट्टी जमावी म्हणून कार्यक्रम करण्याचं नवं बळ मिळू लागलं. ज्या पूर्वजांनी आपल्या घरावर तुळशी पत्रे वाहिली आणि आपल्यासारख्यांना आज खुले आभाळ दिले त्या स्वातंत्र्यवीरांचे आणि विरांगणाचीही ओळख ह्या नवीन पिढीला करून देताना माझा ऊर कित्येक वेळा भरून आला.
असा हा स्वतःची ओळख राहावी म्हणून सुरु झालेला मराठी रेडिओचा प्रवास माझ्या आयुष्यतील एक मोलाचे योगदान ठरेल ह्याची जाणीव मला मला शहर सोडताना रेडिओ कार्यकर्त्यांनी, कैक मराठी कुटुंबांनी आणि असंख्य चाहत्यांच्या रेडिओ स्टेशन वरच्या सततच्या फोनने दिली. 
अजूनही मला भेटल्यावर जेव्हा काही चाहते मला प्रेमाने "आर. जे. प्रणाली" म्हणून संबोधतात तेव्हा माझ्या मुखातून एकच घोष-वाक्य निघत, "हितगुज हे तुमच्याशी, जोडूया नाते मराठी मातीशी!" 

* सदर लेख माझा मावस भाऊ अमीत लोकरे ह्याला समर्पित. जो आज फिलाडेल्फियामध्ये आपल्या दोन मुलींना उत्तम मराठी साहित्याची गोडी लावत आहे.  

Saturday, June 11, 2022

तेथे कर माझे जुळती...


काल बे एरिया मध्ये आर्ट ऑफ लिविंगचे गुरुजी म्हणजे अर्थात श्री श्री रविशंकर ह्यांचा एक छानसा कार्यक्रम आयोजला होता, ज्यात अगदी नवोदित बालकांनाही समाविष्ट होण्याची संधी होती. अर्थात माझ्यासारखे कित्येक पालक ह्या संधीचा लाभ घ्यायला आतुरलेले. मला तर अगदी ३ दिवस आधी ह्या सकाळच्या कार्यक्रमाचे तिकीट मिळाले. ईशानला बुधवारी रात्री सांगून झोपवलेलं, सकाळी आपल्याला साडे आठला निघायचंय तेव्हा लवकर तयार व्हायचय आणि मुळात कपड्यांवरून रुसायचं नाही. जमलं तर सदरा घालायचा आणि हट्ट न करता तयार व्हायचं नाहीतर तुला कार्यक्रमाऐवजी शाळेत रवाना करू. तसं ते पिल्लू तयार झालं. त्याला माहित नव्हतं आई नेमकं कुठे नेणार आहे ते... मलाही माहित नव्हतं त्याला कार्यक्रम आवडेल का? का तो कंटाळून मला घरीच आणेल पण तरीही म्हटलं पहावं प्रयोग करून. तशी मला थोडी खात्री होती किमान गाण्याचा आणि भजनाचा कार्यक्रम तो आवडीने पाहिलं ह्याची. नाही म्हणायला अगदी दीड वर्षाचा असताना त्याने माझा ३ तासाचा कथक चा कार्यक्रम न रडता पाहिला होता. शिवाय सहा महिन्यापूर्वी कथक च्या रेकॉर्डिंग लाही तो छान एकटाच बसला होता. म्हणून थोडा धीर केला होता. 

  लगबगीने आम्ही सकाळी कार्यक्रमाला पोहचलो, सभागृह एकदम भरले होते. अगदी दोन महिन्याच्या बाळापासून ते १२ वर्षाच्या मुलांपर्यंत खूप बालक - पालक तिथे होते. आम्हाला पोहचायला तसा उशीरच झालेला, त्यामुळे मागे जागा मिळेल तिथे आम्ही स्थिरावलो. बसता क्षणीच गुरुजींनी सगळ्यांना प्रेमाने हाक दिली आणि अखंड सभागृह शांत झाले. ईशानही त्याच सभेचा एक हिस्सा आणि त्यानेही सभेचा आदर करेल असं आचरण बसता क्षणीच दर्शवल. थोड्याच वेळात गुरुजींनी मेडिटेशन करू सुचवलं आणि मला कळेना आता हे पिल्लू काय करेल ह्याच. थोडेसे खुर्चीत बसून जमतील असे व्यायाम प्रकार सुरु केले आणि ईशान एकदम आपल्याला हे रोजचे शाळेतले प्रयोग आई बरोबर करायचेत तर आपण आईला आधी सांगावं हे असं आणि तसं कर ह्या आविर्भावात मलाच सूचना सुरु झाल्या. अगदी डोक्यावर हात मारावा का भरपूर हसावं ह्या द्विधा मनःस्थितीत असतानाच गुरुंजींची सूचना आली आता डोळे बंद आणि मोठे श्वास घ्या तसा हा पट्ठ्या एकदम सगळ्या सूचना व्यवस्थित follow करू लागला. ईशानच्या मॉंटेसरी मध्ये योगाचा एक तास घेतात एवढच मला वर्षभर माहीत होत पण नेमकं ह्या मुलांना ध्यानालाही बसवतात ह्याची सूतराम कल्पनाही मला नव्हती. घरी नाही म्हणायला तो माझ्यासोबत थोडा योगा करण आणि मी ध्यानाला बसल्यावर कधीतरी कॉपी करण ह्या पलीकडे ह्याने आम्हाला जराही शाळेच्या प्रयोंगबद्दल कल्पना दिली नव्हती. त्याच ते छानस रूप पाहून मला खूपच गंमत वाटली. काही का असेना हा १० मिनिट जर असा बसला तरी कार्यक्रम सफल झाला असं मला उगाच वाटलं.  संपूर्ण २५ मिनिटे जरी तो डोळे बंद करून बसला नाही तरीही सभेचा भंग करावा असं त्याने काहीच केलं नाही. आजू-बाजूच्यांना जराही त्रास दिला नाही. भजनाचा कार्क्रम सुरु झाल्यावर मात्र त्याला रेस्टरूम आणि रेस्टॉरंट ला जायचं होत. तसा मग ब्रेक घेतला आणि त्याचा डबा त्याला बाहेर खाऊ घातला. मग साहेब पुन्हा चार्ज झाले आणि आत आले. एव्हाना गुरुजींचा प्रश्न-उत्तराचा कार्क्रम सुरु होणार होता. मला पुन्हा चिंता आता हा बाहेर येईल आणि मला खेळायला नेईल. 


गुरुजींनी थोडेसे ज्ञानाचे संभाषण सुरु केले आणि त्या संभाषणात हे पिल्लूही रमले. सभेतल्या लोकनासोबत तो ही "yes", "no " अशी उत्तरे देऊ लागला. सगळ्यांनी टाळ्या वाजवल्या तर ह्यानेही आपल्या टाळ्या त्यात आवडीने ठोकल्या. मला वाटलं सगळ्यांसोबत मुलांना असं करायला आवडतच. पण थोडं निरखून पाहिलं तर साहेब मोठ्या माणसासारखे ऐटीत बसून सगळं ऐकत होते. शिवाय पहिल्यांदाच सभागृहात त्याला त्याची अशी खुर्ची मिळाली होती, त्याचाही रुबाब असावाच. गुरुजी सगळं इंग्रजीत बोलत असल्याने, ईशानला सगळं समजतंय ह्याची मला खात्री होती. मध्येच गुरुजींनी प्रश्न केला, इथे आर्ट ऑफ लिविंग चे किती शिक्षक आहेत? तसे काही हात वरती गेले, आणि त्यात आमच्या चिरंजीवाचाही लांबलचक हात वरती होता. कपाळावर हात मारून मी त्याला खाली कर म्हणाले तरी साहेब हटेनात. इतक्यात आजू-बाजूच्या आणि मागच्या रांगेतल्या सगळ्यांचाच हशा पिकला. मागच्या काका-काकूंनी त्याला एकदम विचारलंच, तू पण शिक्षक आहेस? तसा हा एकदम म्हणाला "हो तर, आहेच मी शिक्षक!" तस्से मला माझे भाऊ आजोबा आठवले (माझ्या आईचे वडील, तालुक्याच्या शाळेत मुख्याध्यापक होते). अजूनही आमच्या पूर्ण वंशावळीला मास्तरांच्याच नात्याने संबोधतात. अगदी कडक शिस्तीचे आणि सगळ्यांना शांतपणे धाकात ठेवणारे. उगाच मनात शंकेची पाल (का भीती?) चुकचुकली... कदाचित चुकून हेच नाही ना आले आपल्या पोटी? तेवढ्यात माझ्या बाजूच्या एका ताई म्हणाल्या, अग असेल तो गुरुजींचा मागच्या जन्मीचा शिष्य, तुला काय माहीत? तस्सा मी सुटकेचा निःश्वास टाकला. (ह्या निःश्वासाची कल्पना केवळ ज्या व्यक्ती भाऊंच्या सहवासात आले त्याच चांगली करू शकतील...) थोड्या वेळाने हळूच मी ईशानला पुन्हा विचारलं "तू खरंच शिक्षक आहेस का रे?" तो म्हणाला "mommy, I am a teacher okay?" तसं मान डोलावण्यापलीकडे माझ्या हातात काहीच नव्हतं म्हणा. मुलं आई-बाबाला कुठे तोंडघशी पाडतील ह्याची प्रचिती यायला आम्हाला आधीच सुरुवात झालीय, आता फक्त आशा करायची अगदी तोंडावर आपटेपर्यंत काही फजिती नको चार-चौघात! 

थोड्याच वेळात गुरुजींनी आश्चर्याचा धक्का दिला मागच्या सगळ्या माझ्या लाडक्या मुलांना मी भेटायला येतोय. कोणीच जागे वरून ऊठू नका आणि उगाच गर्दी करू नका. मी सगळ्यांना भेटायला येतोय. अर्थात अमेरिकेतली सभा सगळ्यांनी गुरुजींचा आदर राखला. उगाच कसलीच गर्दी धावपळ झाली नाही. आणि हळू हळू गुरुजी सगळ्या रांगांमध्ये येउन भेट देऊ लागले. आता पुन्हा माझ्यातली आई जागी झाली, ईशानला पट्टी पढवायला. गुरुजी येतील तर नमस्कार कर हात जोडून वैगरे वगैरे. त्याला गुरुजी हा शब्द तसा अनभिज्ञ. पण तो "हो" म्हणाला. हळूहळू गुरुजी आमच्या रांगेसमोर आले अगदी माझ्या आणि ईशानच्या अर्ध्या हाताच्या अंतरावर... मीही ह्या सत्पुरुषाला माझ्या आयुष्यात पहिल्यांदाच इतक्या जवळून पाहत होते आज. भारतात असताना गुरुजींना इतक्या जवळून पाहायचं कधीच भाग्य झालं नाही. कदाचित आपल्या सुपुत्राची कृपा असावी. आजच्या सभागृहातही सगळ्यांना इतक्या जवळून गुरुजींना पाहताच आलं अस नाही. काहीच इतके भाग्यवंत. त्यांना पाहता क्षणीच माझ्या डोळ्यातून अचानक अश्रू वाहिले... समजलच नाही नेमकं काय होत होते ते. ईशानही हात जोडून त्यांच्या समोर एकही अक्षर न बोलता काही क्षण स्तब्ध. गुरुजींना डोळे भरून पाहताही येणार नाही अशा काही तो ऊर्जेचा स्रोत भासला. ते थोडे पुढे निघाले, तसे ईशान म्हणाला "नमस्ते आजोबा!" तेव्हा मी अचानक भानावर आले. पाहिलं तर पिल्लू अजूनही हात जोडून होता. अचानक मला राऊळ महाराजांची आंगणे वाडीतली भेट स्मरली. त्यांना मी देवळाच्या गाभाऱ्यात अशीच सहजच भेटले होते, मला तर तो पर्यंत माहीतही नव्हत राऊळ महाराज कोण आहेत हे. त्यांनाही पाहता क्षणी माझ्या डोळ्यात असेच अश्रू आले होते... भानावर येईपर्यंत भक्तांची रांग त्यांच्यापुढे लागली आणि गर्दी जमली होती. त्या गर्दीतून बाहेर आले तसे मामा-मामी आणि मावशी-काका मला म्हणाले भाग्यवान आहेस तू इतक्या जवळून तुला पाहता आलं तेही तू पहिल्यांदाच आलेल्या जत्रेला. एवढ्या वर्षात पहिल्यांदा आम्हालाही त्यांचे ह्या जत्रेत दर्शन झाले, कदाचित तुझा पायगुण असावा... तेव्हा मला काहीच समजल नव्हतं. त्या नंतरचा हा तसाच एक सुखद अविस्मरणीय, वर्णातीत अनुभव. जेथे सगळ्यांचेच सहज कर जुळले होते, मनं प्रसन्न झाली होती आणि आनंदाश्रू ओसंडून वाहत होते...