Saturday, March 19, 2022

Utopia

बऱ्याचदा लहान मुलं आपल्याला खूप मोठ्या संकल्पना खूप साध्या छोट्या कृतीतून समजावतात... तेव्हा वाटत हे इतकं सगळं सोप असताना आपण उगाच कुठल्यातरी boundary line मध्ये आपला game अडकवतो आणि जगण्याचा मुक्त आनंद हरपवतो. 
आजचा अजून एक अनुभव जो आमच्या छोट्या ओमीने आम्हाला दिला. त्याने पुन्हा एकदा आम्हाला जाणीव झाली आपल्यातला निखळ पणा थोडा गमावण्यापेक्षा आहे तस जग पाहता येणं हेसुद्धा एक प्रग्लभ लक्षणं आहेच ना?
आज आमचा तीन वर्ष ११ महिन्याचा ओमी community park मध्ये खेळायला गेला तर community मधली लहान मूल  नसल्याने, आमचा दोघांचाही त्याने पूर्ण घाम गाळला, इतका की त्याच्या पार्कमध्ये आम्ही तिघांनीही पळायच्या शर्यतीतली  बक्षीसं घेतली आणि शेवटी पार्कमधल्या climbers वर चढून बसलो, इतक्यात कुठूनशी १०-१२ वर्षाची दोन मुलं तिथे आली. बाप लेकाला त्या मुलांची कंपनी मिळाल्याने मी सुटकेचा निःश्वास टाकला घरी स्वयंपाक गरम करायला पळ काढला.  
तोच अमेयचा पंधरा मिनिटात फोन, ओमी ने नव्या मुलांना घरी यायचं निमंत्रण दिलंय आणि ती आल्याखेरीज साहेब पार्कमधून घरी येणार नाहीत. हा आमच्या आता सरावाचा भाग आहे, शेवटी पार्कमधली असलेली मुलं घरी घेऊन आल्याशिवाय आमचे साहेब आमच्याशी सहकार पुकारत नाहीत, त्यामुळे मीही अमेयला लगेचच होकार दिला. फक्त विचारलं ती मुलं जेवलीत का आपल्या घरी बेत करणार आहेत. त्यावर अमेय म्हणाला मी येतो मग पाहू. मला काहीतरी तो सांगणार असं वाटलं पण आमच्या पट्ठ्याने बाबाला कसलाही वेळ दिला नाही. इकडून तिकडून पळवून, आपली गाडी त्या मुलांना देऊन, स्वारी घरी आलीच. सगळेच ओमीच्या play room मध्ये आणि अमेय त्यांच्या मागोमाग. माझं आपलं एका पाहुण्यांशी बोलणं संपवून, मी त्याच्या खोलीत नव्या मित्र मैत्रिणींना hi करायला गेले तोवर २०-२५ मिनिटे झाली होती आणि ८ वाजायची late घंटा मी वाजवणार तोच ती सगळी मुलं आपापली खेळताना दिसली.  आमचा छोटा त्याच्या गाड्यांसोबत व्यस्त, १० वर्षाचा Kadeline ओमीच्या फळ्यावर गणितं करत होता १२ वर्षाची हुशार Cathy अमेयशी मस्त गप्पा मारत होती. मीही त्यात सामावले. मुलं मिक्स origin ची होती. मी सहजच विचारलं कुठे राहतात, तर Cathy म्हणाली ती आपल्या बाबाला भेटायला आलीत. मला वाटलं बाबा इथेच राहणारा असेल, म्हणून पत्ता विचारणार तोच अमेय म्हणाला बाजूच्या मोटेल मध्ये आलेत सगळे. मी एक क्षण गोंधळले. त्या मुलीच्या काहीसं लक्षात आलं. भाषा समजली नाही तरी तिने माझा चेहरा छान वाचला आणि लगेचच म्हणाली, माझा बाबा खूप प्रवास करतो, पण तो आम्हाला भेटायला येतो दर दोन आठवड्याने. म्हणून मग आम्ही कुठल्या तरी हॉटेल मध्ये भेटतो आणि आमचा विकांत घालवतो. मी म्हटलं अच्छा, मस्त आहे तुझा बाबा. मग तुझी शाळा आई बाकी कुटुंब? तर सगळी माहिती तिनं पुरवली, मला एकूण ३ भावंडं. त्यातली दोन  बाबाची दुसऱ्या पत्नी सोबतची इत्यादी ते अगदी माझी सख्खी आई एका नव्या boyfriend सोबत राहते आणि त्याला carona बिअर आवडते इतपर्यंत. इतकं सगळं तिने इतक्या सहजपणे सांगितलं की मलाही त्यात काहीच वावगं नाही वाटलं. पण उगाचच मत्सर मात्र वाटला. वयाच्या पंधराव्या वर्षी सुद्धा मला माझ्या बाबाने घरात मला दुसरी आई आणावी ह्यावर माझं माझ्या आज्जी, मावशी, माम्या  आणि आत्यांशी एकमत नव्हतं, दुसरी आई आमच्या घराला आवश्यक असूनही आम्ही दोघी बहिणी आणि माझा बिच्चारा बाबा आम्ही सगळेच कित्येक वर्ष संभ्रमात होतो. तब्बल ७ वर्ष ह्या गोष्टीचा घरी जप झाला शेवटी मी दहावीत असताना माझ्या बाबानेच सांगितलं माझ्या मुली आता मोठ्या आहेत मला कोणा सोबतीणीची गरजच काय आणि विषय गुंडाळला. पण आज का कुणास ठाऊक ती समोर असलेली छोटी Cathy मला खूप काही सांगून गेली, थोडं धस्स झालं काळजांत. त्या मुलांना जेवायला द्यावं तर आपल जेवण ह्यांना आवडेल न आवडेल ह्या संभ्रमात मी त्यांना विचारल, थोडस सरबत घेणार का? त्यावर मुलं लगेचच तयार झाली आणि dinning वर आली. ओमीच्या रूम मधून निघताना आमची ऑफिस खोलीही पहिली... आणि आमची खोली पाहायला जाणार इतक्यात मुलांना मी पळवलं... मला आणि अमेयला समजतच नव्हतं नेमकं. तोच Cathy पुन्हा एकदा म्हणाली, तुमचं घर खूप सुंदर आहे. ओमीचा कार बेड आहे तसाच काहीसा माझ्या बाबानेही मला घेतला होता. त्याची खेळण्याची खोली खूपच भारी आहे. सरबत पिताना ती अजूनच मोकळी झाली... माझा बाबा खरतर former baseball champion Curtis Goodwin आहे. त्याला डोक्याला खेळताना मार लागला आणि मग त्याला early retirement घ्यावी लागली. इतका सगळा संवाद चालू असताना, मला अमेय काहीतरी सांगू पाहत होता...माझ्या लक्षात येत होत की ह्या मुलांना आपण आता जेवायला त्यांच्या घरी पाठवू. पण समजत नव्हतं कस थांबवावं.  छोटा Kadeline थोडा वेगळा होता, सगळं अवसान जमवून तोडक मोडक बोलत होता. अमेय त्याच्याशी फुल्ल expression मध्ये थोडं समजतंय types आणि मीही त्याला दाद देत, मध्येच शेवटी Cathy म्हणाली माझा भाऊ autistic आहे, त्याला बरंच समजत पण. तो अजूनही शाळेत जात नाही, आम्ही त्याला घरीच शिकवतोय. त्याला शाळेत जायचंय, तर लगेचच Kadeline म्हणाला माझा vaccine shot झाला की मला शाळेत जाता येईल आणि Cathy त्यावर आम्हाला मान डोलावून सांगत होती, "It may not be possible!"  पुनःश्श आम्ही सुन्न आणि अमेय ने फायनली मला सांगितलं अरे त्यांचा बाबा almost हलत डुलत येईल आणि smoke चा भयानक वासही येईल तर जरा सांभाळून. मुलांना आता घरी पाठवूया खूप उशीर झालाय त्यांना जेवायला. Cathy ने बाबाला फोन करून बोलावलं, तर बाबा ५-१० मिनिटात आमच्या घरात हजर. मुलांना अमेय घरी घेऊन येणार तर त्याने घर पाहून ठेवलं होत, अगदी जबाबदार बाबासारखं. मी न्यायला येईन असं अमेयला कबूलही केलं होत. तसा बाबा आला...आपला बाबा आला तर Kadeline धावत गेला आणि आमच्या घराचं दार त्याने स्वतःच्या घरासारखं उघडलं. बाबासाहेब आत आले, तर मी मास्कच्या  शोधात... शेवटी एकदाचा मास्क हातात येईपर्यंत त्याने अमेयचा यथोच्च समाचार घेतला. तुमच घर आणि तुम्ही छान लोक आहेत इथपासून ते तुम्हाला Disney ट्रिप करायची असेल तर मला सांगा मी एकदम free मध्ये तुमची व्यवस्था करेन. माझ्या मुलांना तुम्ही घरी आणून खेळवलंत म्हणून त्याने पोटभरून आभारही मानले. अतिशय झिंगलेलालच खरंतर, तरीही बापाचं हृदय त्याचं, आपल्या मुलांनी so called  सभ्य वर्गातल्या कुटुंबाशी संबंध जोडला ह्यातच त्याला धन्यता वाटली, असा आमचा थोडा बहोत समाज झाला. त्याने अगदी आवर्जून सांगितलं माझ्या मुलांशी खेळायला उद्याही आवश्यक या, मस्त वाटेल त्यांना. इथे त्यांना कोणीच मित्र नाहीयेत, एकटी पडतात कधीकधी. पुन्हा पुढल्या खेपेस आम्ही ह्याच मोटेल मध्ये येऊ म्हणजे त्यांनाही आवडेल. निघायचा विषय कसातरी निघाला आणि त्या दोन्ही मुलांनी garage मधल्या वहाणा हाताने main door समोर नेल्या, मुलीने बाबाच्याही चपला बाहेर काढल्या आणि त्यालाही... सगळ्या कुटुंबाने बाहेरच वहाणा घातल्या, घरातली छोटी खुर्ची नाकारत. अगदी बाहेर पडले तरी गप्पा मारत राहिले... त्याच्या मुलांनी त्याच्यासमोर MacDonald ची फर्माईश केली तर बाबा एका पायावर तयार... शेवटी हसत खेळत तिघेही गेले. 
त्यानंतर मी आणि अमेय कितीतरी वेळ बोलत होतो... समजेना घाबराव का नाही.  Curtis सारखा मागे लागला होता माझा नंबर घ्या लिहून मला miss call दया. आम्ही तथा कथित सभ्य वर्ग, संभ्रमात...  कसतरी टाळलं नंबर देवाण घेवाणीच... पण कित्येक वेळ झाला प्रसंग कसा घ्यावा ह्यावर कीस पाडत बसलो. खरंतर कुटुंब वत्सल लोकांशी तस घाबरू नये पण सध्या इथे चोरी प्रकरणं खूपच बळावलीत, इतकी लोक दिवसाच mail box तोडण्यापासून ते घर फोडी पर्यंत काहीही करताहेत. मग वाटलं जाऊ दे भित्यापोटी ब्रह्मराक्षस! काही व्हायचच असेल तर होऊ देत. पण आपण जर ह्या तथा कथित उद्ध्वस्त कुटुंबाला थोडा हक्काचा पाहुणचार दिला तर त्यात काय बिघडलं? एखादया श्रीमंत खेळाडूला आज अचानक दारिद्र्याचे दिवस आले म्हणून त्याने उसनं अवसान घेऊन मी श्रीमंत आहे भासवण्यासाठी एखाद खोटसं खड्याचं घड्याळ खरं सांगितलं तर काय बिघडलं? जाताना त्यानेही मायेपोटी आमच्यासमोर हातच तर जोडले होते "नमस्ते" म्हणून आणि आम्हीही. 
ह्या सगळ्या प्रसंगानंतर मला माझ्या पप्पाची आठवण मात्र नक्की आली... एकदम त्या Curtis सारखा माझा बाबाही दिलदार... सगळ्यांना free boat ride आणि मुंबई दर्शन करवणारा, ओमी सारखा कोणाही अनोळखी माणसाला घरी जेवायला आणणारा आणि ओमी सारखाच नितळ निर्मळ! हा ओमीही आयुष्यभर असाच राहू देत निरागस, सगळ्यांना आपलंस म्हणणारा... 
अशी जगातली सगळीच मुलं जर आयुष्यभर निर्मळ राहिली तर दुनिया Utopia लवकरच होईल, ह्या विचारानेच आज खूप दिवसांनी युद्धाच्या विध्वसंक बातमी नंतर शांत झोप लागली.  
 

9 comments:

dr.sheetal said...

Khupach chaan shabdankan!

Unknown said...

Khup sunder

Savita Mhetar said...

Pranali, loved your blog. Ishaan's viewpoint is considerable. We have so many moments to enjoy free life given by God but we think so much unnecessary stuff. Please keep on writing followup blogs.

शेखर रेडीज said...

छान व्यक्त झाली आहे.. अशीच लिहीत राहा.

pranali said...

Thank you so much Dr :)

pranali said...

So true...we are so bounded to few unwritten definitions that we forgot to enjoy...I think that's what kids do us they make us unlearn and learn new things

pranali said...

Thank you Sir for the motivation!

pranali said...

Thank u

Unknown said...

अगदी मोजक्या शब्दात खूप काही सहजपणे व्यक्त केले आहे.अंतर्मुख होऊन विचार करायला लावणारे लेखन आहे.