Tuesday, June 7, 2016

स्वर सौख्याचे स्वप्न सा-यांचे!

" ज्याला भाषेचा आधार लागत नाही तरीही सर्वव्यापी, अनुभवसन्मुख आणि अक्षय असणार संगीत मात्र  सगळ्यांना भावत. अशा संगीताविषयी अरुणा ढेरे म्हणतात, 
        'ते गाणे कसले? होता नुसताच निळासा रंग
         आयुष्य समजण्याचाही तो निळा निळा प्रारंभ..'

असा काहीसा संगीताचा अर्थ उमगलेली अमेरिकेत जन्माला येउन वाढणारी  केवळ  १८ वर्षीय  युवती जेव्हा शास्त्रीय, उपशास्त्रीय ते bollywood, hollywood अशी एकपात्री  संमिश्र मैफिल  रंगवते. त्याविषयी थोडेसे … "



      अमेरिकेतील मेमोरिअल डे च्या विकांताला कालीफोर्निया बे एरियात एक अनोखा संगीत प्रवास भारतीयांना आणि अमेरिकन रहिवास्यांना अनुभवता आला. शास्त्रीय संगीताने  सुरु झालेल्या  गान प्रवासाची  हॉलिवूड गाण्यांनी सांगता झाली. ह्या प्रवासाची एकपात्री नायिका म्हणजे 'ABCD : अमेरिकन बॉर्न  कल्चर्ड  देसी - सौख्या इनामदार'.
ही एकपात्री संगीत मैफिल केवळ प्रसिद्धी झोतात येण्यासाठी नव्हे तर 'अमेरिकन लंग असोसिएशन' करिता मदतनिधी जमा करण्यासाठी केली गेली ही बातमी आपल्याला  सुखद आच्छर्याचा धक्का देते. ही मैफिल रसिकांसाठी मात्र मोफत होती. 

    ह्या मैफिलीत शुद्ध सारंग राग, मिया मल्हार, मिश्र तिलंग ह्यातील विविध बंदिशी सोबत  एकताल, तीनताल आणि दादरा तालातील विविध बंदिशी आणि तराणे सौख्याने सादर केल्या. ह्याचबरोबर ४० वर्ष जुन, सुप्रसिद्ध अस आशाजींच "युवती मना " हे संगीत मानापमान मधल नाट्यगीत तर "मी राधिका, मी प्रेमिका" आणि "तिन्ही सांजा सखे मिळाल्या" अशी कठीण भावगीतही तीने सादर केली.  "मन मंदिरा  तेजाने" ह्या नुकत्याच प्रदर्शित झालेल्या 'कट्यार काळजात घुसली' ह्या चित्रपटातील 'देस' रागावर आधारित सौख्याच्या गाण्याने, सगळ्या श्रोतृ वर्गाला मंत्र मुग्ध केल. अमेरिकन श्रोताही  तिच्या हिंदुस्थानी संगीतला मनसोक्त दाद देत होता. शास्त्रीय- उपशास्त्रीय आणि भावगीतांनी नटलेली मैफिल मध्यान्तरानंतर अचानक पान खायो संय्या हमार म्हणत समोर आली आणि खुर्चीतले श्रोते डान्स फ्लोअर वर येउन थांबले ते अगदी बॉलीवूड - हॉलीवूड फ्युझन संपेपर्यंत. बलम पिचकारी आणि How Deep is your love ह्या गाण्यांचं फ्युझन  रसिकांना सौख्याच्या पुढल्या यशस्वी  प्रोफेशनल मैफिलीची चाहूल देऊन गेला. तर  Whitney Houston यांच्या जागतिक विक्रम घडवलेल्या  'I will always love you' , ह्या सौख्याच्या ढंगातील गाण्याने  रसिकांच्या मनात कायमस्वरुपी घर वसवलं.   
     जेव्हा २०१३ मध्ये सौख्याच्या  झालेल्या मोठ्या लंग सर्जरी बद्दलची ओळख होते, तेव्हा विविधतेने नटलेली ही एकपात्री दोन- अडीच तासाची गान मैफिल श्रोत्यांना अधिकच भावते. "शास्त्रीय संगीतामुळे  फुफ्फुसाच्या मोठ्या आजारातून लीलया बाहेर आले" असे जेव्हा सौख्या सांगत स्टेज उभी राहते तेव्हा शास्त्रीय संगीताचा तिचा अभ्यास आणि कलेशी असलेल तिचं घट्ट नात आपल्या समोर येत. अतिशय नम्र पणे आपल्या गुरूंचा आणि माता-पित्यांचे आभार मानताना ही संगीत मैफिल ज्या कार्यकर्त्यांमुळे आणि वादकांमुळे  शक्य झाली त्यांचे ऋण ही आपल्यावर कायम राहतील अशी  गोड कबुलीही ती देते. अशी ही सौख्या सगळ्यांना "विद्या विनयेन शोभते।" संदेश पोचवते.
ह्या कार्यक्रमासाठी सौख्याचे जोशी मामा-मामी खास नाशिक हून तर अमेरिकेतल्या विविध शहरांमधून काही मित्र परिवार आवर्जून आला होता. 'सुझान गार्सिया' ह्या अमेरिकन लंग असोसिएशन मधील  सौख्याच्या परिचारिका विशेष करून उपस्थित होत्या.

    ह्या उत्तम मैफिलीला दिग्गज वादक लाभले. शास्त्रीय संगीताच्या मैफिलीत सतीश तारे ह्यांनी तबलावादन केल तर मनोज ताम्हनकर ह्यांनी हर्मोनिअम वर साथ दिली. अवनी आणि प्रियांका ह्या मैत्रिणींची सौख्याला तानपुऱ्यावर साथ मिळाली. उत्तार्धात मेलडी मेकर्स ह्यांनी सौख्याच्या गाण्यांना सिने तारांकित साथ दिली तर ध्वनी संयोजन डीजे डनिअल यांनी सांभाळले. सौरभ इनामदार ह्या सौख्याच्या जुळ्या  बंधूने साक्सोफोन वर कमालीची झुबी डुबी रंगवली तर अमन चोप्रा ह्या सौख्याच्या मित्राने गिटार वर मज्जा आणली. सनी मोझा ह्यांनी इंग्रजीत तर प्रणाली उबाळे-पोतदार ह्यांनी मराठी सूत्रसंचालन उत्तमरीत्या संभाळल. उत्तम स्टेज डेकॉर आणि प्रकाश व्यवस्था अशा सगळ्याच साथींनी ही मैफिल  पंचतारांकित बनली. ह्या सगळ्या व्यवस्थापनेचे श्रेय खरतर इनामदार कुटुंबियांना आणि त्यांच्यासोबत जोडलेल्या अनेक कुटुंबियांना - ज्यांनी ह्या कार्यक्रमासाठी मनापासून काम केल त्यांना जात. 
   

   अमेरिकेत जन्माला येउनही हिंदुस्थानी संगीतात पारंगत होण्याचा ध्यास घेणारी सौख्या म्हणजे एक अजब रासायनच! खरतर सौख्याला वयाच्या अडीच तीन वर्षापासून हिंदुस्थानी संगीतातल  बाळकडू आई - रेणुका ह्यांच्याकडूनच मिळाल. खेळणी सोडून कीबोर्ड वर अलंकार वाजवण्याचा खेळ खेळणाऱ्या सौख्याला कालीफोर्निया बे एरियातील संगीत शिक्षक श्री मनोज आणि अर्चना ताम्हनकर  याचं योग्य ते मार्गदर्शन लाभत आहे.  इंग्रजी आणि हिंदी गाणी मात्र सौख्या ऐकून आत्मसात करते. "आजकाल सौख्याच्या हिंदी गाण्यांच्या उच्चारांवर आणि बारकाव्यांवरती मला जास्त मेहनत मला घ्यावी लागत नाही" असे रेणुका आनंदाने सांगते. सौख्याला "मी राधिका मी प्रेमिका" ह्या गाण्यासाठी संगीतकार श्रीधर फडके ह्यांचे प्रत्यक्ष मार्गदर्शन आणि आशीर्वाद लाभले, हा भाग्ययोगच म्हणावा.योगायोगाची गोष्ट अशी सौख्या आपला  वाढदिवस  श्रेया घोषाल ह्या तिच्या आवडीच्या bollywood गायीकेसोबत साजरा करते.     

      सौख्याला आतापर्यंत  मिळालेल्या  गाण्यातील पारितोषिकांची गणना तिच्या वयाहूनही अधिक आहे. ती बे एरीयातील फ्रीमाउंट शहरातील talent winner आहे,तिला कल्याणजी आनंदजी पैकी आनंदजींनी  best  teen  voice म्हणून गौरविले आहे, तर R. D. बर्मन स्पर्धेची ती विजेती आहे. 'सितारे' आणि 'आशिया TV' वरची ती प्रसिद्ध स्टार performer आहे. बऱ्याचश्या समारंभाची सुरुवात तिच्या गाण्याने होते. अवघ्या तीन दिवसात संस्कृत मध्ये वन्दे मातरम शिकून सादर करणाऱ्या सौख्याला  खूप ठिकाणी भारतीय आणि अमेरिकन राष्ट्रगीत एकाच ठिकाणी गाण्यासाठी खास निमंत्रणही असतं.

  
        अशा गुणी  सौख्याची अनोखी मैफिल व्हावी ह्याच स्वप्न रेणुका माऊलीने बघितलं, अमित ह्यांनी त्याला खतपाणी घातलं. साक्षात सौख्याने ही मैफिल सजवली तिच्या संगीत गुरूंच्या मार्गदर्शनाने आणि पूर्वा - महेश काळे, सुधीर अरविंदन यांच्या मदतीने. संदीप उमराणी आणि सिद्धार्थ राणे ह्यांनी सौख्याच्या मैफिलीसाठीचे खास फोटो शूट केले. हा कार्यक्रम योजनाबद्ध रीतीने व्हावा म्हणून श्री कृष्णन ह्यांचे मार्गदर्शन लाभले.  ह्याचबरोबर बे एरियातील पन्नास कुटुंब एक झाली आणि ही पाचशे रसिकांची मैफिल यशस्वीरित्या फुलली. ह्या मैफिलीच एका वाक्यात श्रेय द्यायचं झाल तर; "एक उत्तम मूल घडवायला एक अख्खा गाव असावा लागतो, तसं अशी आपल्या संस्कृतीशी नाती सांगणारी सुसंस्कृत पिढी परदेशात तयार करण्यासाठी आपल्या संस्कृतीचा वारसा जपणारी, प्रेरणादायी कुटुंब आपल्या जवळ असावी लागतात." असा मित्र परिवार लाभण हा दैवयोग असला तरी आपली मुलं अशा परिवारात वाढवण्याची दृष्टीही असावी लागते. अमित-रेणुका हे एका आदर्श पालकांचे उदाहरण आहे. योग्य तिथे प्रोत्साहन आणि योग्य तिथे आदरयुक्त धाकात ते आपल्या मुलांना घडवण्याचा प्रयत्न करत आहेत.  म्हणूनच  ही  मैफिल म्हणजे फक्त एका इनामदार परिवारापुरती मर्यादित न राहता खर तर साऱ्यांची होऊन जाते. 
       असा हा  "स्वर सौख्याचे, स्वप्न साऱ्यांचे" कार्यक्रम म्हणजे साक्षात पूर्वेकडून पच्छिमेकडला सुसंस्कृत भारतीय पिढीचा प्रवास, सगळ्या परदेशवासी भारतीयांना नक्कीच प्रेरणादायी ठरेल.

No comments: